उपसा बंद
By admin | Published: April 21, 2016 01:14 AM2016-04-21T01:14:32+5:302016-04-21T01:14:32+5:30
पुणे, अहमदनगर, सोलापूर व बीड या जिल्ह्यातील दुष्काळी भागात सोडण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन कुकडी डावा कालव्याद्वारे ११४ किमीपर्यंत पोहोचले आहे.
नारायणगाव : पुणे, अहमदनगर, सोलापूर व बीड या जिल्ह्यातील दुष्काळी भागात सोडण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन कुकडी डावा कालव्याद्वारे ११४ किमीपर्यंत पोहोचले आहे. पाण्याचे आवर्तन सुरळीत व्हावे व पाणी पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी कुकडी कालव्यावरील ३८० उपसा सिंचन मोटारी काढण्यात आल्या आहेत़
कोणीही कालव्याची तुटफूट केली किंवा कालव्यावरून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर यांनी दिली़
कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी डावा कालव्याद्वारे उन्हाळी पिण्याचे आवर्तन दि़ १६ एप्रिल पासून सोडण्यात आलेले आहे़ हे पाणी पुणे, अहमदनगर, सोलापूर व बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी सोडण्यात आलेले आहे़ ते पाणी ११४ कि़मी़वर पिंपळगाव वीसा गेटपर्यंत पोहोचले आहे़
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कालव्यावरील गळती कमी करून उपसा सिंचन विद्युत मोटारी काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून, कालव्यावरील एकूण ३८० उपसा मोटारी काढण्यात आल्या आहेत़ नव्याने निदर्शनास येणाऱ्या मोटारी काढण्याचे काम व त्यावरील कारवाई महसूल विभाग, पोलीस व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात येत आहे़ (वार्ताहर)
कुकडी कालवा पिण्याचे आवर्तन सुरळीत होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई विचारात घेऊन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कालव्यातून अनधिकृत पाण्याचा उपसा करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- जी. बी. नन्नोरे,
कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे