अंधारमय जीवनात ६० वर्षांनंतर प्रकाश; बाळू कांबळे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:24 AM2017-12-12T04:24:03+5:302017-12-12T04:24:12+5:30
शिक्षणाची बाराखडी गिरवण्याच्या ऐन वयात त्याची दृष्टी गेली. अन् अवघं भविष्यच अंधारमय झालं. अंधकारमयच जीवनाचा शेवट होईल, अशा निराशेने ग्रासलेले असताना वयाच्या ६६ व्या वर्षी म्हणजेच ६० वर्षांनीसुद्धा त्यांना दृष्टी प्राप्त झाली.
शिरूर : शिक्षणाची बाराखडी गिरवण्याच्या ऐन वयात त्याची दृष्टी गेली. अन् अवघं भविष्यच अंधारमय झालं. अंधकारमयच जीवनाचा शेवट होईल, अशा निराशेने ग्रासलेले असताना वयाच्या ६६ व्या वर्षी म्हणजेच ६० वर्षांनीसुद्धा त्यांना दृष्टी प्राप्त झाली. येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्या प्रयत्नातून निमगाव म्हाळुंगे येथील बाळू नाना कांबळे या ज्येष्ठ नागरिकाच्या आयुष्यात शेवटच्या टप्प्यात पुन्हा उमेदीची ज्योत प्रज्वलित झाली.
कांबळे हे ७ वर्षांचे असताना तापामुळे इन्फेक्शन होऊन त्यांचे डोळे गेले. त्यामुळे शाळेत प्रवेश घेण्याचे त्या वेळचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. आपल्याला आता दिसणार नाही, या कल्पनेने कांबळे प्रचंड निराश झाले. कुटुंबीयांनाही याचे दु:ख झाले. मात्र वास्तव कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांनी (पालकांनी) स्वीकारले व अंधारमय जीवनाचा प्रवास सुरू झाला. शेतीवर अवलंबून कांबळे कुटुंबीयांनी आपल्या अंध मुलाचा प्रामाणिक सांभाळ केला. दिवसांमागून दिवस गेले. तारुण्यांच्या उंबरठ्यावर विवाहाचा विषय आला असता मावसमामाने आपली मुलगी अंध भाच्यास दिली. कांबळेंचा विवाह तिच्याशी झाला. यामुळे कांबळेंना जगण्याची एक उमेद मिळाली. अंधत्वामुळे कांबळेंना जीवनात कामधंदा करता आला नाही. मात्र त्यांच्या पत्नीने घरातील दुधाचा धंदा सांभाळला. वेळप्रसंगी शेतात खुरपणीचे कामही केले.
गुजरात येथील एका कामगाराच्या डोळ्यांत प्लॅस्टिक पडून त्यांचे दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. ‘लोकमत’च्या बातमीमुळे या व्यक्तीला माहिती मिळाल्याने त्याने शिरूर येथे डॉ. भालेकरांची भेट घेतली. त्याच्या डोळ्यांवर भालेकरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यात त्याला पुन्हा दृष्टी आली. याबाबतची माहिती कांबळेंना त्यांच्या मित्रांनी दिली. यावर त्यांनी शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
कांबळे यांची केस अवघड होती. मात्र कांबळेंची दुर्दम्य इच्छाशक्ती व डॉ. भालेकर यांचे स्किल यामुळे ६० वर्षांनंतर कांबळे यांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण प्रज्वलित झाला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली व एका डोळ्याने (उजवा) त्यांना दिसू लागले. १९८४मध्ये त्यांचे लग्न झाले होते. ४२ वर्षांनी त्यांना आपल्या कुटुंबीयांना डोळे भरून पाहता आले.
1 ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांना कांबळे यांना लहानपणी (दृष्टी जाण्याआधी) पाहता आले. एवढेच काच ते त्यांचे भाग्य. जिच्याशी लग्न केले, तिला मात्र पाहता येत नाही याचे शल्य कांबळेंंना नेहमी असायचे.
2दोन्ही मुले पुढे कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून काम करू लागली. पुढे त्या दोघांचे तसेच मुलीचेही लग्न झाले. पत्नीलाही नाही आणि मुलांनाही कांबळे यांना दृष्टिअभावी पाहता आले नाही. मुलांची विवाहकार्येही डोळे भरून पाहता आली नाहीत. तीन ते चार वेळा नेत्रतज्ज्ञांकडे डोळे तपासणी केली. मात्र यश आले नाही.