पालिकेच्या पैशातून खासगी सोसायट्यांमध्ये ‘उजेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2015 12:46 AM2015-04-17T00:46:10+5:302015-04-17T00:46:10+5:30
महापालिकेच्या निधीतून खासगी सोसायट्यांच्या आवारात उजेड पाडण्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी परिसरात समोर आला आहे.
पुणे : महापालिकेच्या निधीतून खासगी सोसायट्यांच्या आवारात उजेड पाडण्याचा धक्कादायक प्रकार वडगावशेरी परिसरात समोर आला आहे. यासाठी महापालिकेच्या पथदिव्यांची दिशाच बदलण्यात आली आहे.
वडगावशेरी येथील प्रभाग १८मध्ये वृंदावननगर भागातील रस्त्यावर चक्क खासगी सोसायट्यांच्या आवारात विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. याची तक्रार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याला धमक्याही देण्यात येत आहेत. या दिव्यांची प्रकाशाची बाजू सोसायट्यांच्या आवाराच्या दिशेने करण्यात आली आहे.
येथील विशाल हाईट्स, विशाल व्हिजन, विशाल व्हिव, सिटी रेसिडन्सी, वेलवर्थ क्लासिक अशा पाच सोसायट्यांमध्ये प्रत्येकी दोन दिवे असलेले खांब उभे केलेले आहेत.
वडगावशेरी नागरी मंचाच्या वतीने आशिष माने यांनी याबाबत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करून या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
अशा प्रकारे खासगी सोसायट्यांमध्ये पथदिवे बसविता येत नाहीत. असा प्रकार घडला असल्यास क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विजय दहिभाते, उपायुक्त विद्युत विभाग
सोसायट्यांमध्ये बसविण्यात आलेले दिवे हे स्वत:च्या पैशातून बसविण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या निधीचा वापर केलेला नाही.
- सुनीता गलांडे, स्थानिक नगरसेविका
४महापालिकेच्या निधीतून कोणत्याही खासगी सोसायट्यांमध्ये कामे करता येत नाहीत. ही बाब माहिती असतानाही नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, त्याबाबत माने यांनी तक्रारही केली आहे. मात्र, त्या तक्रारीची दखल अद्यापही क्षेत्रीय कार्यालयाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका कोणाच्या हितासाठी काम करते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.