Pune Rain: पुणे शहरात पुढील चार दिवस हलका पाऊस; राज्यातही पावसाचे प्रमाण कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:49 AM2022-07-19T08:49:58+5:302022-07-19T08:50:05+5:30
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी
पुणे : पुणे शहरात सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान होते, तसेच पावसाची सारखी रिपरिप सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेले सूर्यदर्शन आज झाले नाही. येत्या चार दिवसांत शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहरात सोमवार सायंकाळी साडेपाचपर्यंत २.९ मिमी पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे ३ मिमी पाऊस झाला. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. या धरणांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला ५, पानशेत २७, वरसगाव ३३, टेमघर १० मिमी पाऊस झाला. चारही धरणांमध्ये मिळून १८.५८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ६३.७३ टक्के आहे.
अरबी समुद्रातील सौराष्ट्र व कच्छच्या किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकले असून त्याचे रूपांतर कमकुवत कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. परिणामी, राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यानुसार मंगळवारी फक्त विदर्भातील अकोला व अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुढील तीन दिवसांत पावसात आणखी घट होईल, असा अंदाज आहे.