पुण्यात पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:27+5:302021-05-18T04:11:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम रविवारी रात्रीपर्यंत पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर जाणवत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम रविवारी रात्रीपर्यंत पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. त्यानंतर सोमवार सकाळपासून जोराने वाहणार्या वार्यांचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. शहरात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या.
सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ८.२ मिमी, लोहगाव येथे ६.२ मिमी आणि पाषाण येथे ९.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. रविवारी दिवसभरात ताशी ३५ ते ४० किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे शहरातील सर्वच भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४० झाडे पडली. त्यानंतर रात्रभरात आणखी १४ ठिकाणी झाडे पडल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे आली होती.
कात्रज येथील हॉटेल तिरंगा, सोन्या मारुती चौक, धनकवडी, सोमवार पेठ, एनआयबीएम रोड, कोरेगाव पार्क, दत्तवाडी पोलीस चौकीसमोर, लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ, हडपसर औद्योगिक वसाहत, सेनापती बापट रोडवरील जे. डब्ल्यु मेरियट, बी टी कवडे रोड, गणेश खिंड रोड, टिंबर मार्केट याठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या.
सोमवारी सकाळपासून वार्याचा वेग कमी होत गेला. सकाळी काही वेळ पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. दुपारनंतर वार्याचा वेगही ताशी ३० किमीपेक्षा कमी झाला. आकाश मात्र दिवसभर ढगाळ होते. पुणे शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगरला ३ मिमी तर लोहगाव येथे ०.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. आशय मेजरमेंटनुसार सोमवारी साडेसात वाजेपर्यंत कात्रज ५.४, वारजे १२, खडकवासला ८, कोथरुड ५.८, लोणी काळभोर ०.४, मोहोळ सोलापूर ०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज वाऱ्याचा वेग ताशी २५ ते ३२ किमी इतका आहे.
मंगळवारी शहरात आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
फोटो - ट्री कटिंग नावाने आहे.