चित्रपट सेटप्रकरणी ८ महिने कोणतेही भाडे न घेता दिल्याचा प्रकार उजेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:43 AM2018-10-23T00:43:35+5:302018-10-23T00:43:38+5:30
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या अधिकारात हा नियम डावलून विद्यापीठाचे मैदान ८ महिने कोणतेही भाडे न घेता वापरण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
- दीपक जाधव
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान प्रतितास २५ हजार रुपये दराने भाड्याने देण्याचा नियम असताना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या अधिकारात हा नियम डावलून विद्यापीठाचे मैदान ८ महिने कोणतेही भाडे न घेता वापरण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. केवळ चित्रपट दिग्दर्शकाने सामाजिक कामांसाठी ६ लाख ५० हजार रुपये त्यांच्या स्तरावर
खर्च करावे, या अटीवर हे मैदान वापरण्यास देण्यात आले. मात्र ते साडेसहा लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. या प्रकरणात विद्यापीठाचे १४ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये ४५ दिवसांसाठी विद्यापीठाचे मैदान भाडयाने घेतले होते. मात्र निर्धारित मुदतीमध्ये त्यांच्या शूटिंगचे काम पूर्ण झाले नाही. चित्रपटाचा संपूर्ण सेट मैदानामधून हलविण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला. त्यापोटी विद्यापीठाकडे किती रुपयांचे भाडे जमा झाले, याची लेखी माहिती सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मागितली होती. त्यातून नागराज मंजुळे यांच्याकडून विद्यापीठाने कोणतेही भाडे घेतले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विद्यापीठाकडे निधी नसल्याचे कारण सांगून पीएच. डी. व एम. फिल.च्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करणे, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय एकीकडे कुलगुरूंकडून घेतला जात असताना दुसरीकडे मात्र चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांना कोट्यवधी रुपयांचे भाडे माफ करण्यात आल्याचे परस्पर विरोधी निर्णय समोर आले आहेत.
चित्रपटासाठी मैदान भाड्याने देताना शासनाच्या नियमानुसार प्रक्रिया पार पाडण्यात आल्या नसल्याचेही उजेडात आले होते. मैदान भाड्याने देताना कुलपती, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच व्यवस्थापन परिषद यांची मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून मैदान खाली करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाने याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्तावही तयार केला होता. मात्र प्रत्यक्षात काहीच कारवाई झाली नाही. कुलगुरूंनी मंजुळेंना मैदान खाली करण्याच्या नोटिसा बजावण्याव्यतिरिक्त कुठलीही कारवाई केली नाही. विद्यापीठाचे मैदान चित्रपटाच्या शूटिंगसाठी ८ महिने बंद राहिल्याने त्या मैदानावर सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती. या पार्श्वभूमीवर हे मैदान कोणतेही भाडे न घेता वापरण्यासाठी दिल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
>विद्यार्थ्यांसाठी निधी नाही; मग ही खैरात का?
शहरात मैदानांची संख्या कमी होत असताना मुळात चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने देण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा होता. खेळाडूंची गैरसोय करून हा निर्णय घेऊन वरून त्यासाठी कोणतेही भाडे न घेणे धक्कादायक आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या योजनांसाठी निधी नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जात असताना मग चित्रपटासाठी ही खैरात का केली जात आहे?
- कुलदीप आंबेकर, प्रदेश सरचिटणीस, लोकतांत्रिक जनता दल
>कुलगुरूंच्या अधिकारात निर्णय
कुलगुरूंना विशेष परिस्थितीमध्ये मैदानाचे भाडे न आकारण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रतितास २५ हजार रुपये भाडे आकारण्याचा व्यवस्थापन परिषदेचा ठराव असला तरी प्रत्यक्षात चित्रीकरण न झाल्याने भाडे आकारण्यात आले नाही.
- डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव
>भाड्याची वसुली करावी
व्यवस्थापन परिषदेने केलेल्या ठरावानुसार संबंधित चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांकडून प्रतितास २५ हजार रुपये या दराने भाड्याची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर विद्यापीठाला आर्थिक नुकसान सोसावे लागेल, असे निर्णय यापुढील काळात घेतले जाऊ नयेत.
- संतोष ढोरे, सिनेट सदस्य