ग्रामीण जीवनातील प्रश्नांवर प्रकाश
By admin | Published: January 10, 2017 02:54 AM2017-01-10T02:54:22+5:302017-01-10T02:54:22+5:30
खेडोपाड्यात काम करताना भेटलेली माणसे, त्यांचे प्रश्न, जातीयता, स्त्रीची लैंगिकता, आदिवासींचे जीवन, समाजजीवनातील वास्तवाचा मागोवा
पुणे : खेडोपाड्यात काम करताना भेटलेली माणसे, त्यांचे प्रश्न, जातीयता, स्त्रीची लैंगिकता, आदिवासींचे जीवन, समाजजीवनातील वास्तवाचा मागोवा घेणाऱ्या एकांकिकांचे विषय या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकत आपल्या कार्याची खऱ्या अर्थाने ओळख करून देत खेडोपाड्यातील जीवनावर व त्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम पुरस्कारार्थींनी केलं.
निमित्त होतं, महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्कार देऊन गौरविलेल्यांच्या गप्पांच्या कार्यक्रमाचे. कार्यकर्ता पुरस्कार मिळालेले देवाजी तोफा, विजय दिवाण, सुशीला नाईक, विशेष ग्रंथ पुरस्कार मिळालेले अरुण जाखडे, ललित ग्रंथ पुरस्कार मिळालेल्या अंजली जोशी, रा. शं. नाट्य पुरस्कार मिळालेले अनिलकुमार साळवे यांनी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात पुणेकरांशी संवाद साधत कार्याची माहिती करून दिली.
अनिलकुमार साळवे म्हणाले, ‘‘गवंडीकाम करत अगदी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. मी बीडचा रहिवासी, येथील भयानकता, येथील लोकांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा या नेहमीच मला अस्वस्थ करायच्या. या सर्व व्यथा मी लोकांसमोर मांडण्यासाठी एकांकिका हे माध्यम निवडले. ग्लोबल आडगाव, शेख मोहम्मद : मराठी माध्यम, तिच्यासाठी वाट्टेल ते या एकांकिकांमधून विविध विषयांना हात घातला. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर नाट्यप्रयोग होतात; मात्र त्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही.’’ (प्रतिनिधी)