बेरोजगारांच्या आयुष्यात प्रकाश फुलेल : गिरीश बापट, लाईट हाऊस उपक्रमाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:07 PM2018-03-26T22:07:20+5:302018-03-26T22:07:20+5:30
केंद्र सरकारने स्किल इंडिया अतंर्गत बेरोजगार, अल्पशिक्षित व शिक्षित युवक युवतींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन सुरू केले आहे. लाईट हाऊस हा तसाच प्रकल्प आहे.
पुणे: बेरोजगार युवक-युवतींना आयुष्यात एक दिशा हवी असते, प्रकाश हवा असतो. महापालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या लाईट हाऊस मुळे त्यांना हा प्रकाश मिळेल व त्याच्या जीवनात सोनेरी पहाट उमलेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ३१ वारजे मधील या लाईट हाऊसचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. भाजपाचे आमदार भीमराव तापकीर,भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक राजाभाऊ बराटे, शिवराम मेंगडे, सुजय कालेले आदी यावेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, केंद्र सरकारने स्किल इंडिया अतंर्गत बेरोजगार, अल्पशिक्षित व शिक्षित युवक युवतींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन सुरू केले आहे. लाईट हाऊस हा प्रकल्पही तसाच आहे. काही संस्थांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देणे हा समाजव्यवस्थेचा भाग आहे.पुणे सिटी कनेक्ट च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूची माथून यांनी महापालिकेच्या विविध समाजपयोगी उपक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या कंपन्या नेहमीच साह्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. लाईट हाऊस द्वारे घेतल्या जाण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची,अभ्यासक्रमांची त्यांनी माहिती दिली. दरवर्षी सर्वसाधारण स्तरातील किमान ७५० विद्यार्थी या केंद्रामधून पूर्ण प्रशिक्षित होऊन बाहेर पडतील असे त्या म्हणाल्या.
नगरसेवक सुशील मेंगडे यांनी प्रास्तविक केले. आमदार तापकीर व अन्य पाहुण्याची यावेळी भाषणे झाली. अमृता बहुलेकर यांनी सुत्रसंचालन केले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आभार मानले.