कोरड्या माळरानावर वीज कोसळली अन् काही क्षणात तिथं गंगा अवतरली; बारामती तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 05:35 PM2021-07-10T17:35:08+5:302021-07-10T17:36:06+5:30
कारखेलचे ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या ज्या परिसरात वीज पडली तिथे जमिनीतुन पाणी येत आहे.
उंडवडी कडेपठार: कधी कधी नैसर्गिक अपत्ती एखाद्या भागासाठी वरदान देखील ठरते. कायम दुष्काळी असलेल्या बारामती तालुक्यातील कारखेल येथील माळरानावर शुक्रवारी (दि. ९) वीज पडली. वीज ज्या जागेवर पडली त्या भेगेतून कोरड्या माळरानावर अक्षरश: पाण्याचा लोंढा वाहू लागला आहे. वीज पडल्यामुळे आमच्या गावात गंगा अवतरली अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. बारामती तालुका कायम आवर्षन प्रवण क्षेत्रामध्ये येतो. येथील सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमिटरच्या दरम्यान असते.
बारामती तालुक्याचा बहुतांश भाग जिरायती पट्ट्यामध्ये मोडतो. कारखेल हे गाव देखील जिरायती पट्ट्यात येते. पाण्याचे दुर्भिक्ष या भागात कायमच असते. गेली २-३ दिवसापासून उंडवडी कडेपठार तसेच आसपाच्या परिसरात झिमझिम सुरु आहे. कारखेल येथे शुक्रवार (दि.९) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमार विजांच्या कडाक्यात पाऊस सुरू झाला. कारखेलचे ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या ज्या परिसरात वीज पडली तिथे जमिनीतुन पाणी येत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गावतील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांनी माळरानावर अचानक जमिनीतुन पाण्याचा वाहताना दिसला आहे. या प्रवाहाने याठिकाणी मोठया प्रमाणात पाण्याचा साठा पाहण्यात येत आहे.या घटनेने परिसरात कुतुहलाचा विषय झाला असुन स्थानिक ग्रामस्थ तसेच इतर परिसरातील ग्रामस्थांनी पाणी पाहण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.
याठिकाणी कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असते. उन्हाळ्यामध्ये जनावरांसह माणसाचे देखील पाण्यामुळे हाल होतात. वीज पडल्याने आमच्या दुष्काळी गावात गंगा अवतरली आहे, अशी प्रतिक्रिया मेंढपाळ किसन तांबे, ग्रामस्थ राजहंस भापकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
---------------------------------