Pune Metro: मेट्रो स्थानकांमध्ये दिव्यांचा लखलखाट अन् खाली मात्र अंधारच अंधार...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 12:56 PM2022-03-22T12:56:40+5:302022-03-22T12:56:58+5:30

महामेट्रोने महापालिकेला दिवे बसवण्यासाठी पैसे दिलेले असूनही त्यांच्याकडून पथदिवे बसवण्याऐवजी जुजबी दिवे लावून काम भागवले जात आहे

lights flicker in pune metro stations but it is still dark | Pune Metro: मेट्रो स्थानकांमध्ये दिव्यांचा लखलखाट अन् खाली मात्र अंधारच अंधार...

छायाचित्र - तन्मय ठोंबरे

googlenewsNext

पुणे : वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गावरच्या पाचही स्थानकांमध्ये दिव्यांचा लखलखाट आहे; मात्र स्थानकांच्या खाली अंधार आहे. महामेट्रोने महापालिकेला दिवे बसवण्यासाठी पैसे दिलेले असूनही त्यांच्याकडून पथदिवे बसवण्याऐवजी जुजबी दिवे लावून काम भागवले जात आहे. त्याचा वाहनधारक तसेच भोवतालच्या नागरिकांनाही त्रास होत आहे.

मेट्रो स्थानकांचे काम सुरू असताना या मार्गांवरील महापालिकेचे पथदिवे काढण्यात आले. आता स्थानकांचे काम पूर्ण होऊन सर्व स्थानके सुरूही झाली आहेत, मात्र त्याखालचे पथदिवे अद्याप बसलेले नाहीत. कमी क्षमतेचे दिवे लावून काम भागवले जात आहे. आधीच स्थानकाचा अवाढव्य सांगाडा उभा राहिल्यामुळे परिसरातील नैसर्गिक उजेडावर मर्यादा आल्या आहेत. गरवारे महाविद्यालयासमोरच्या गल्लीत तर दिवसाही स्थानकाच्या बांधकामामुळे अंधार पडतो. आनंदनगर व आयडियल कॉलनीजवळच्या स्थानकांभोवतालच्या रस्त्यांचीही हीच स्थिती आहे. एसएनडीटी स्थानकाजवळचा संपूर्ण भागही अंधारात असतो. हाच प्रकार नळस्टॉपजवळ बांधण्यात आलेल्या दुहेरी उ्ड्डाणपुलाच्या खालीही झाला आहे. 

महामेट्रोने जेवढे पथदिवे काढले, त्या सर्व पथदिव्यांसाठी महापालिकेकडे पैसे जमा केले आहेत. त्यातून स्थानकांचे काम झाल्यानंतर किंवा स्थानकांच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब टाकून झाल्यानंतर लगेचच हे काम होणे अपेक्षित होते. आधी होते तसेच उच्च क्षमतेचे दिवे या सर्व स्थानकांच्या खाली बसवणे गरजेचे आहे. उलट स्थानकामुळे त्यांची क्षमता किंवा संख्या वाढवण्याची गरज आहे. तसे न करता महापालिकेने कमी क्षमतेचे व तेही तात्पुरते दिवे लावून फक्त गरज भागवली आहे. गरवारे स्थानकासमोरच्या व्यावसायिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आधीचे दिवे प्रकाशमान होते, आता बसवलेले दिवे स्थानकाच्या खाली, मेट्रोच्याच खांबांचा आधार घेऊन बसवलेले आहेत. त्यांचा व्यवस्थित प्रकाश पडत नाही. वाहनधारकांचाही असाच अनुभव आहे. गरवारे, एसएनडीटी, आनंदनगर, आयडियल व वनाज अशी ५ स्थानके या मार्गावर आहेत. रस्त्यावरचा बराच मोठा अवकाश स्थानकांच्या बांधकामाने व्यापला आहे. त्याखाली प्रकाशाची गरज असल्याने त्वरित दिवे बसवावेत, अशी मागणी होत आहे.

आमच्यकडे अंधारच अंधार
 
''स्थानकाच्या कामाचा बराच त्रास आम्ही सहन केला आहे. स्थानकामुळे आमच्या घराभोवती आता दिवसाही अंधाराचेच साम्राज्य असते. महापालिकेने त्वरित दिवे बसवावेत अशी मागणी स्थानकाभोवतालच्या रहिवाशांनी केली आहे.''  

''स्थानकांचे काम पूर्ण झाल्याशिवाय दिवे बसवणे योग्य नव्हते, आम्ही तात्पुरती सोय म्हणून दिवे बसवले होते. आता मेट्रो स्थानकाच्या मध्यभागापासून ते रस्त्याच्या दोन्ही बाजूंनाही नियमित दिवे बसवण्यात येतील. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.''

Web Title: lights flicker in pune metro stations but it is still dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.