व्हिडिओ लाईक करा, पैसे मिळवा! साॅफ्टवेअर इंजिनिअरला साडेसतरा लाखांना गंडा
By नारायण बडगुजर | Published: December 16, 2023 05:06 PM2023-12-16T17:06:33+5:302023-12-16T17:07:30+5:30
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ ते ६ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचा हा प्रकार घडला....
पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाला व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यास सांगून पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर टास्क देऊन १७ लाख ६१ हजार ९५० रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ ते ६ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचा हा प्रकार घडला.
महेंद्र मुक्तीनाथ अधिकारी (३४, रा. वाकड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १६) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी अधिकारी यांना फोन काॅल करणारी करीश्मा, टेलीग्राम आयडीधारक, विविध बँकांचे १५ खातेधारक, मोबाइल धारक, व मेलआयडीधारक यांच्यासइ अज्ञात इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र अधिकारी हे साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांना करीश्मा हिने फोन केला. दररोज कंपनी ब्लाॅगर, युट्युब व्हिडिओ लाईक तसेच शेअर करण्यासाठी दोन हजार कमवून देण्याचे आमिष दाखवून टेलीग्राम युझरसोबत संपर्क करण्यास सांगितले.
तसेच महेंद्र यांना प्रथम फ्री टास्क करण्यास प्रवृत्त केले. त्यातून महेंद्र यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महेंद्र यांना एक हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर प्रीपेड टास्कच्या नावाखाली वेळावेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर मोठी रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. मात्र अद्यापपर्यंत त्यांची रक्कम परत न करता महेंद्र यांची १७ लाख ६१ हजार ९५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.