लोणी काळभोर : तीस सीसी कॅमेरे बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:22 AM2018-01-04T02:22:26+5:302018-01-04T02:22:37+5:30
समाजविघातक कामे करणारे व गुन्हेगार पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या हलचाली समजण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होते. त्यामुळे नागरिकांनी गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.
लोणी काळभोर - समाजविघातक कामे करणारे व गुन्हेगार पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या हलचाली समजण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होते. त्यामुळे नागरिकांनी गावातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोणी काळभोर ग्रामस्थांनी लोकवर्गणीमधून गावात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गावठाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत येथील ग्रामपंचायत कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी महेश ढवाण बोलत होते.
लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.
या वेळी हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम काळभोर, रेखा काळभोर, ग्रामविकास अधिकारी बोरामणे, कामगारनेते सोपानराव हाडके, अभिनव चेतना पतसंस्थेचे बाळासाहेब काळभोर, हवालदार रूपेश भगत व गावातील व्यावसायिक उपस्थित होते.
या वेळी हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रशांत काळभोर म्हणाले, ‘‘गावात वाहन पार्किंगचा विषय गंभीर झाला आहे. त्यावर सम-विषम पार्किंगसारखी उपाययोजना करण्याची गरज आहे.’’ या संदर्भात महेश ढवाण म्हणाले, ‘‘दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंगची ठिकाणे ठरवण्यासाठी वाहतूक पोलीस, ग्रामपंचायत, व्यावसायिक यांची एक समिती नियुक्त करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.’’
या संदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन ढवाण यांनी दिले. उपसरपंच योगेश काळभोर यांनी आभार मानले.
पुणे शहरालगत लोणी काळभोर गाव असल्याने उत्तरोत्तर नागरीकरणाचा वेग वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे परिसरातील गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पोलीस बळ अपुरे आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत आवश्यक आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे पोलिसांना गुन्हेगार जेरबंद करण्यासाठी मदत होईल. या आवाहनाला उपस्थित नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गावातील सर्व व्यावसायिक, बँक, पतसंस्था, नागरिक व
ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी करून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सीसीटीव्हीचे लोकार्पण करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.