फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मर्यादित; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांच्या आवाजाची तपासणी
By श्रीकिशन काळे | Published: November 8, 2023 07:27 PM2023-11-08T19:27:56+5:302023-11-08T19:28:39+5:30
आवाजाने अनेकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांची तीव्रता कमी ठेवण्याचे आदेश यापुर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते
पुणे : दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामध्ये मोठ्या आवाजांचे फटाके असल्याने अनेकांना त्रास होतो. हा त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासली. त्यामध्ये मर्यादेपेक्षा कमी आवाज नोंदवला गेल्याची माहिती मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिली.
बाजारात मोठ्या आवाजाचे फटाके विक्रीसाठी आणले जातात. त्या आवाजाने अनेकांना त्रास होतो. पण तो त्रास होऊ नये म्हणून त्यांची तीव्रता कमी ठेवण्याचे आदेश यापुर्वीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. त्यानूसार फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता बनवली आहे. सध्या दिवाळीपूर्वी बाजारात उपलब्ध असणाऱ्या १४ विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता बुधवारी महाराष्ट्र नियंत्रण मंडळातर्फे मोजण्यात आली. यामध्ये आठ फटाक्यांची नमुने तपासण्यात आले. लक्ष्मी तोटा फटाके, डबलबार फटाके, लवंगी मोठा फटाके, सुतळी बॉम्ब, 1000 ची फटाक्याची माळ, 2000 ची फटाक्याची माळ, आकाशात एकाच वेळी उडणारे पन्नास शॉर्टचे फटाके इत्यादी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता यावेळी मोजण्यात आली. आकाशात एकाच वेळी उडणारे पन्नास शॉट व इतर आठ प्रकारच्या फटाक्यांची आवाजाची तीव्रता ही नियमानुसार मर्यादित असल्याचे आढळून आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉक्टर सुनील मासालकर यांनी कृषी महाविद्यालयातील मैदान या तपासणीसाठी उपलब्ध करून दिले होते, अशी माहिती शिंदे यांनी दिली.