कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात ‘आधार’साठी पहाटेपासून रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 07:27 PM2020-03-12T19:27:48+5:302020-03-12T19:29:39+5:30
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयात आधार केंद्रावर नागरिकांना आधार कार्ड देण्याची सोय विस्कळीत
पुणे : महापालिकेतर्फे आधार कार्ड काढण्यासाठी सेवा केंद्र सुरू केली असली, तरी ते बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्डसाठी कुठेच ‘आधार’ मिळत नाही. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील केंद्रातही अनेक गैरसोयी असून, तिथे तर नागरिक पहाटेच रांगेसाठी येत आहेत. पण कार्यालय दहानंतर उघडल्यावर ऑपरेटरच गैरहजर असल्याने नागरिकांना निराश होऊन घरी जावे लागत आहे.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयात आधार केंद्रावर नागरिकांना आधार कार्ड देण्याची सोय आहे. पण गेल्या काही दिवसांपासून येथील सुविधा विस्कळीत झाली आहे. मंगळवारी कार्यालयाला सुटी होती आणि बुधवारी तर ऑपरेटरच गैरहजर होता. त्यामुळे पहाटे सहा वाजल्यापासून लोक रांगेत थांबले होते, त्यांना परत जावे लागले. अनेक महिला आपल्या बाळाला घेऊन आल्या होत्या. त्यांना रांगेत तासनतास उभे राहावे लागते. केंद्रावर पहिल्या २० जणांनाच कार्ड बनविण्यासाठी घेतले जाते. त्यानंतरच्या लोकांना परत दुसर्या दिवशी रांगेत उभे राहावे लागते. अनेक बँका आणि सेवा केंद्र देखील बंद असल्याने नागरिक या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात गर्दी करत आहेत.
आधार नसेल तर बरीच कामे रखडतात. म्हणून नागरिकांना आधारसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. केंद्रावरील कर्मचारी नागरिकांशी वाद घालत असल्याने प्रशासनाने योग्य सुविधा आणि केंद्रांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी केली जात आहे.
==============
मी याआधी ३ वेळा या कार्यालयात येऊन गेले. २ वेळा सर्व्हर डाऊन असल्याने काम झाले नाही आणि एकदा २१ वा नंबर असल्याने काम झाले नाही.आज पहाटेच नंबर लागण्यासाठी मी रांगेत उभी राहिले. दहा नंतर कार्यालय उघडले. ७ वा नंबर असूनही केवळ आॅपरेट न आल्याने संबंधित अधिकाºयांनी आता उद्या या म्हणून सर्वांना घरी पाठवले. कामाला सुट्टी टाकून आम्ही येथे पहाटेपासून रांगेत थांबायचे आणि परत घरी जायचे हा त्रास का सहन करायचा? आधार कार्ड बाबतचे कोणतेही काम हे नागरिकांच्या मूलभूत अधिकाराची बाब आहे.आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी गरजेचे आहे. त्यामुळे त्या-त्या भागांत सक्षम आधार सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जेष्ठ नागरिक तसेच महिलांना आपल्या तान्ह्या बाळासह आधार कार्डच्या कामासाठी सकाळपासून रांगेत लागावे लागते, याची प्रशासनाने दखल घ्यावी.
- अॅड. विंदा महाजन, नागरिक
==================
कार्यालयासमोर झोपावे लागते...
रोज पहिले २० नागरिक कार्डसाठी घेताय. म्हणून नागरिक पहाटे सहापासून तिथे येऊन थांबतात. अनेकजण तर तिथेच झोपतात. अनेकदा महिला, जेष्ठ नागरिकही या ठिकाणी येऊन झोपतात. त्यामुळे त्वरीत यावर उपाययोजना व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.