कॅनव्हासवरील रेषा बोलक्या झाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:42+5:302021-03-20T04:11:42+5:30
पुणे : रेषेतून तयार होणारे वेगवेगळे आकार... रेषा वाढल्या किंवा कमी झाल्यानंतर मानवी चेहऱ्यातील होणारे बदल आणि निसर्गात, समाजात ...
पुणे : रेषेतून तयार होणारे वेगवेगळे आकार... रेषा वाढल्या किंवा कमी झाल्यानंतर मानवी चेहऱ्यातील होणारे बदल आणि निसर्गात, समाजात वावरताना केलेल्या निरीक्षणाद्वारे चित्रे कशी काढायची... याचा प्रत्यक्ष अनुभव बोलक्या रेषांच्या प्रात्यक्षिकांमधून कलारसिकांनी घेतला. प्रख्यात चित्रकार घनश्याम देशमुख यांनी आर्ट मॅजिक चित्रप्रदर्शनादरम्यान कॅनव्हासवर रेषा बोलतात तरी कशा...याचे उपस्थितांसमोर सादरीकरण केले.
आर्ट मॅजिक क्लासेसच्या वतीने १४ व्या आर्ट मॅजिक या विनामूल्य कलाप्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये बोलक्या रेषांचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी आर्ट मॅजिकच्या संचालिका महालक्ष्मी पवार आणि संयोजक अंबादास पवार, कृतिका कामदार, सागर दारवटकर, ईश्वरी मते, यज्ञेश हरिभक्त, रेहान बाबुडे, अनुजा गुर्जर, पश्चिमा वैद्य, सानिका रेणुसे, तनया गडाळे, प्रेम ओस्तवाल, आदिती काशिद, सृष्टी भुजबळ आदी या वेळी उपस्थित होते.
घनश्याम देशमुख म्हणाले, ‘सोप्या रेषांमध्ये चित्र काढता येतात. प्रत्येक चित्राची पार्श्वभूमी या रेषा आहेत. ख-या अर्थाने रेषांनी चित्रे बोलकी होतात आणि रसिकांना आवडतात. आपल्या कल्पकतेतून चित्र काढणे सहज शक्य आहे. त्याकरीता निरीक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. चित्रकारांनी आपल्या स्वत:च्या शैलीमध्ये चित्र काढण्याचा प्रयत्न करायला हवा.’