साहित्यिकांमध्ये भाषिक सौहार्द निर्माण व्हावा - डॉ. अशोक कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:59 PM2018-09-30T23:59:39+5:302018-09-30T23:59:52+5:30

अनुवादाची स्थिती फारशी चांगली नाही

Linguistic harmony in literature should be created - Dr. Ashok Kamat | साहित्यिकांमध्ये भाषिक सौहार्द निर्माण व्हावा - डॉ. अशोक कामत

साहित्यिकांमध्ये भाषिक सौहार्द निर्माण व्हावा - डॉ. अशोक कामत

googlenewsNext

शाळेत असल्यापासूनच महामहोपाध्याय पोतदार, गो. प. नेने, पंढरीनाथ डांगे, मोडक असे हिंदी भाषेचा प्रचार करणारे शिक्षक लाभले. आमच्या काळात हिंदी भाषेच्या परीक्षा देऊन शालेय वयातच पंडित या पदवीपर्यंत मजल गाठता यायची. महाविद्यालयात जाण्यापूर्वीच हिंदी भाषेतील पंडित ही पदवी मला मिळाली होती. त्या वेळी मी हिंदी प्रचाराचे वर्ग घेत असे. प्रांतिक भाषेबरोबरच हिंदी भाषेतून काम केल्यास देशसेवा घडेल, हा त्यामागचा उद्देश होता. गेली ६० वर्षे मी भाषाविषयक काम करत आहे. रा. चिं. ढेरे यांच्यासह संशोधन करू लागल्यापासून त्यांचे लक्ष दक्षिणेकडे, तर माझे लक्ष उत्तरेकडील अभ्यासाकडे जास्त होते. नामदेवांच्या ध्यासामुळे; तसेच संत एकनाथ, संत रामदास अशा संतांच्या प्रवासाचा शोध घेत बृहनमहाराष्ट्र आणि उत्तर भारतात भ्रमंती करत राहिलो. मी नाथसंप्रदायाचा अभ्यासक असल्याने देशभर प्रवास करण्याची संधी मिळाली आणि मी बहुभाषिक होत गेलो.

टिळकयुगात, गांधीयुगात महाराष्ट्राबाहेर राहून काम केलेल्या पत्रकार, विचारवंतांच्या कामाचा मी अभ्यास केला. दोन्ही भाषांमध्ये पीएच.डी. करून तोच अभ्यासाचा विषय मानला. यानिमित्ताने भारतातील भाषाविषयक कार्याची व्याप्ती जाणून घेण्याची संधी मिळाली. संतांचा अभ्यास भाषिक सौहार्दावर अवलंबून असतो. ज्याला संत साहित्याचा राष्ट्रीय पातळीवर अभ्यास करायचा असेल त्याला भाषिक सौहार्द जपावेच लागते. हिंदी आणि मराठी भाषांमध्ये अनुवाद करता आले. त्यामुळेच उत्तर प्रदेश सरकारतर्फे सौहार्द सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची दोन लाख रुपयांची रक्कम मी गुरुकुल प्रतिष्ठानच्या कामासाठी खर्च करणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे साहित्यिकांना पुरस्काराची दिली जाणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असते. साहित्यिकांचा सन्मान यथायोग्य केला जावा. मराठी साहित्यातील अनुवादाची स्थिती फारशी चांगली नाही. मराठी भाषिक आपल्या शेजारील प्रांतांचाही पुरेसा अभ्यास करत नाहीत. कोणत्याही विद्यापीठात इतर भाषांचा अभ्यास नीट होत नाहीत. आपल्याजवळील गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या प्रांतातील भाषांच्या शिक्षणाची नीट सोय नाही. मराठी विभागही तौलनात्मक अभ्यासाला फारसे महत्त्व देत नाही. मराठी माणसाने अभिमान बाळगावा अशा अनेक समृद्ध गोष्टी मराठी साहित्यामध्ये आहेत; मात्र दुसऱ्या भाषेत गेल्याशिवाय इतर भाषिकांना ही समृद्धी कशी कळणार? महाराष्ट्रातील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार अत्यंत कमी प्रमाणात मिळाले याचे कारण म्हणजे, चांगल्या साहित्यिकांची प्रतिमा इतर प्रांतात उमटावी, यासाठी आपण काहीही केलेले नाही. वि. स. खांडेकर यांचे वाङ्मय अनुवादकांनी हिंदी, तमीळ आणि गुजराती भाषेमध्ये अनुवादित केले. त्या प्रांतांमध्ये आजही खांडेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे. आपण कायम आपल्या प्रांतापुरतेच मर्यादित राहिलो आहोत. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनाही अस्खलित हिंदी बोलता येत नसल्याने त्यांची प्रतिमा दिल्लीमध्ये डागाळलेली आहे. हिंदी व्यवस्थित येत नसेल तर आपण देशाचे नेतृत्व कसे करणार? नेतृत्व, सामाजिक कार्य, संशोधन करायचे असल्यास हिंदीची कास धरायला हवी; मात्र भाषावार प्रांत रचनेनंतर अत्यंत संकुचित झालो आहोत. भारतीय भाषांची समग्र ओळख असणे आवश्यक आहे. शिवाजीमहाराज, ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज यांचे कार्य हिंदी भाषेतून इतर भाषिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता आले पाहिजे. भाषिक समृद्धी वाढविण्यासाठी साहित्यिकांमधील सुसंवाद वाढला पाहिजे.


मराठी साहित्यातील अनुवादाची स्थिती फारशी चांगली नाही. कोणत्याही विद्यापीठात इतर भाषांचा अभ्यास नीट होत नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार अत्यंत कमी प्रमाणात मिळाले याचे कारण म्हणजे, चांगल्या साहित्यिकांची प्रतिमा इतर प्रांतात उमटावी, यासाठी आपण काहीही केलेले नाही. भाषिक समृद्धी वाढविण्यासाठी साहित्यिकांमधील सुसंवाद वाढला पाहिजे, असे मत उत्तर प्रदेश सरकारचा सौहार्द सन्मान जाहीर झाल्याच्या निमित्ताने डॉ. अशोक कामत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Linguistic harmony in literature should be created - Dr. Ashok Kamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे