रिक्षाचालकाने केला सव्वा लाखाचा ऐवज परत
By admin | Published: February 20, 2015 12:22 AM2015-02-20T00:22:47+5:302015-02-20T00:22:47+5:30
महिला प्रवाशाची रिक्षामध्ये विसरलेली दागिन्यांची बॅग रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केली. या बॅगेमध्ये सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने होते.
पुणे : महिला प्रवाशाची रिक्षामध्ये विसरलेली दागिन्यांची बॅग रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केली. या बॅगेमध्ये सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने होते. आपल्या रिक्षामध्ये विसरलेली ही बॅग प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी सत्कार केला.
अनिल मुरलीधर खरात (वय ३९, रा. काकडेवस्ती, ज्ञानेश्वरनगर, कोंढवा) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. खरात हे रविवारी कोथरूड भागामध्ये रिक्षाप्रवासी शोधत असताना कविता अशोक देसाई (वय २९, रा. सातववाडी, हडपसर) या आईवडिलांसह रिक्षामध्ये बसल्या. हातामधील निळ्या रंगाची बॅग त्यांनी रिक्षाच्या मागील डिकीमध्ये ठेवली. हे सर्व प्रवासी डी. पी. रस्त्यावरील घरकुल लॉन्स येथे उतरले. ही बॅग त्या तशाच विसरून गेल्या. बॅगेत सोन्याचे गंठण, सोन्याचे नेकलेस आणि १४ हजार ३०० रुपयांची रोकड, लहान मुलांचे कपडे होते. देसाई यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.
ही बाब दुसऱ्या दिवशी खरात यांना लक्षात आली. त्यांनी तातडीने बॅग घेऊन मार्केटयार्ड पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर यांनी कोथरूड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहितीची खातरजमा केली. देसाई यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून घेण्यात आले. स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्यासमक्ष देसाई यांना ही बॅग परत करण्यात आली. तसेच खरात यांचा सत्कारही करण्यात आला.