मुलींच्या खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेट; वसतिगृह प्रमुख म्हणतात, शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनींचे समुपदेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:40 IST2025-03-20T11:39:49+5:302025-03-20T11:40:48+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या जात असताना विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच सापडणे आश्चर्यकारक

मुलींच्या खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेट; वसतिगृह प्रमुख म्हणतात, शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनींचे समुपदेशन
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहातील खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळली. दरम्यान, संबंधित शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनींचे समुपदेशन केल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ वसतिगृह प्रशासनाने दिले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या जात असताना विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच सापडणे आश्चर्यकारक आहे. याप्रकरणी दोषी विद्यार्थिनींवर आणि हा सर्व प्रकार दडपणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली. सदर प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील असल्याचे विद्यापीठाकडून नमूद करण्यात आले आहे.
ही घटना फेब्रुवारीतील असून, त्याबाबत विद्यापीठ वसतिगृहामध्ये तक्रार प्राप्त होताच विद्यार्थिनीचे समुपदेशन केले तसेच त्या विद्यार्थिनीचे वसतिगृहाच्या दुसऱ्या इमारतीत स्थलांतर केले होते. या प्रकरणी वसतिगृह प्रशासनाने नियमांनुसार चौकशी करून संबंधित विद्यार्थिनीवर समुपदेशन व वर्तन सुधारण्याच्या दृष्टीने कारवाई देखील केली होती. तिच्या पालकांना देखील कल्पना दिली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहातील खोलीत मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळून आली. वसतिगृहात वास्तव करत असलेल्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. सगळ्यात महत्त्वाचे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत. असे असताना येवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची कुलगुरूंना विनंती करण्यात आलीय. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कटरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली होती.