पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस

By नितीश गोवंडे | Published: September 6, 2024 06:17 PM2024-09-06T18:17:42+5:302024-09-06T18:26:42+5:30

गणेशोत्सवात काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा महत्वपूर्ण निर्णय

Liquor shops closed in this area during 10 days of Ganeshotsav in Pune So three days for the whole city | पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस

पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. उत्सवाच्या काळात फरासखाना, खडक आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बैठकीत केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला हा प्रस्ताव पाठवला आहे.

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महिनाभरापासून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. उत्सव काळातील बंदोबस्ताची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांची उपस्थिती होती.

उत्सवाच्या कालावधीत मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली होती. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनंतर फरासखाना, खडक आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने (वाइन शाॅप, परमिट रूम) दहा दिवस बंद ठेवण्यात यावीत, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने तीन दिवस मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे (ड्राय डे) आदेश दिले आहेत. प्रतिष्ठापना (७ सप्टेंबर), विसर्जन मिरवणूक (१७ सप्टेंबर) आणि मिरवणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाविकांची सुरक्षा, गर्दीचे नियोजन, वाहतूक कोंडी सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, गुन्हे शाखेची पथके, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी असणार आहेत. मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणी बाॅम्ब शोधक नाशक पथकाकडून (बीडीडीएस) नियमित तपासणी करण्यात येणार आहे. गर्दी, गैर प्रकारांवर शहरातील वेगवेगळ्या भागात लावलेले १ हजार ३५६ सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

भाविकांसाठी ‘माय सेफ ॲप’...

उत्सवातील घडामोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी मंडळांची पाहणी (मॅपिंग) केली आहे. भाविकांसाठी माय सेफ ॲप तयार करण्यात आले आहे. उत्सवाची माहिती, वाहने लावण्यासाठी जागा, पोलिस मदत केंद्र, पादचारी मार्ग, बंद रस्त्यांची माहिती या ॲपद्वारे दिली जाणार आहे. भाविकांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येणार असून, मदत केंद्रांचे काम २४ तास सुरू राहणार आहे.

चोरटे, रोड रोमिओंचा बंदोबस्त...

उत्सवात मध्यभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीत मोबाईल, रोकड, दागिने चोरीला जातात. पोलिसांनी चोरट्यांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. उत्सवाच्या काळात परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्या शहरात येतात. शहरातील लाॅज, हाॅटेलची पोलिसांकडून तपासणी सुरू करण्यात येणार आहे. गर्दीत महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. छेड काढणाऱ्यांना पकडून त्यांचे छायाचित्र भरचौकात लावण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

असा असेल बंदोबस्त...

अपर पोलिस आयुक्त - ४
पोलिस उपायुक्त - १०
सहायक पोलिस आयुक्त - २३
पोलिस निरीक्षक -१२८
सहाय्यक पोलिस निरीक्षक - ५६८
पोलिस कर्मचारी - ४ हजार ६०४
होमगार्ड - ११००
राज्य राखीव पोलिस दल - १ तुकडी
केंद्रीय सुरक्षा दल, शीघ्र कृती दल - १० तुकड्या

Web Title: Liquor shops closed in this area during 10 days of Ganeshotsav in Pune So three days for the whole city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.