दारूची दुकाने 'या' तीन तारखेला रात्री एकपर्यंत सुरू राहणार; तळीराम उशिरापर्यंत मद्यसेवन करणार
By नितीन चौधरी | Published: December 22, 2023 03:25 PM2023-12-22T15:25:08+5:302023-12-22T15:27:04+5:30
राज्यातील मद्यविक्री परवानाधारक विक्रेत्यांना वाइन शॉप तसेच बीअर बार सुरू ठेवण्यास रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास राज्य सरकारची मान्यता
पुणे: ख्रिसमस तसेच थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाइन शॉप सुरू ठेवण्यासाठी २४, २५ डिसेंबर तसेच ३१ डिसेंबरच्या रात्री साडेदहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत तसेच बीअर बारला पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांना उशिरापर्यंत मद्यसेवन करता येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम १३९ (I) (सी), कलम १४२ (२), (एच-I) (आयव्ही) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ तसेच ३१ डिसेंबरला राज्यातील मद्यविक्री परवानाधारक विक्रेत्यांना वाइन शॉप तसेच बीअर बार सुरू ठेवण्यास रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
शहरात अन्य दिवशी वाइन शॉपसाठी रात्री साडेदहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत व शहरात मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत मुदत होती. आता या मुदतीत २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या रात्री वाइन शॉप तसेच बीअर बारसाठी मुदत वाढविण्यात आली आहे.