एमपीएससीच्या तीन परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:09 AM2021-07-23T04:09:25+5:302021-07-23T04:09:25+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आगामी काळात होणाऱ्या तीन परीक्षांसाठी अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी अनाथ प्रमाणपत्र सादर करण्याचे ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आगामी काळात होणाऱ्या तीन परीक्षांसाठी अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी अनाथ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अर्जासोबत सादर केलेल्या अनाथ प्रमाणपत्रात विसंगती असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व अनाथ प्रमाणपत्रांची पडताळणी करून ज्यांची विसंगत माहिती आहे, अशांचा दावा रद्द केला आहे. तर उर्वरित पात्र उमेदवारांची एमपीएससीच्या आगमी तीन परीक्षेसाठी यादी आयोगाने प्रसिद्ध केली.
आयोगाने महिला व बालविकास विभागाकडून अभिप्रायनुसार उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. अन्य उमेदवारांच्या अनाथ आरक्षणाचा दावा रद्द केला. परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार संबंधित परीक्षांची निकालाची प्रक्रिया राबविणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा या तीन परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यात अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यांना अनाथ प्रमाणपत्राची स्कॅन करून आयोगास सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार उमेदवारांनी प्रमाणपत्र आयोगाकडे सादर केली.
प्रमाणपत्रात तफावत
संबंधित उमेदवारांच्या अनाथ प्रमाणपत्राची तपासणी केली. ज्या मुलांच्या कागदपत्रावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व ज्यांचे आई-वडील आणि अन्य नातेवाइकांपैकी कोणाबाबतही माहिती उपलब्ध नाही, अशा मुलांनाच अनाथ आरक्षण लागू राहील, अशी तरतूद आहे. मात्र, काही उमेदवारांच्या प्रमाणपत्रात नातेवाइकांची माहिती दिसून येत आहे. परंतु, या मुलांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेखाची बाब विसंगत असल्याचे दिसून आले आहे.