भिगवणला यादीतून शंभर मतदारांची नावे गायब
By admin | Published: February 22, 2017 01:47 AM2017-02-22T01:47:06+5:302017-02-22T01:47:06+5:30
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७४.८१ टक्के मतदान झाले. १ लाख ९९ हजार ४२९ मतदारांनी मतदान केले
इंदापूर : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७४.८१ टक्के मतदान झाले. १ लाख ९९ हजार ४२९ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये १ लाख ६ हजार ८५१ पुरुष व ९२ हजार ५७८ हजार महिला मतदारांचा समावेश होता. भिगवण येथील मतदार यादीतून शंभर मतदारांची नावे गायब झाल्यामुळे मतदार संतप्त झाले होते. पळसदेव, लाखेवाडी येथील तांत्रिक बिघाडामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
या निवडणुकीकरिता एकूण २ लाख ६६ हजार ५९१ मतदार होते. त्यामध्ये १ लाख ४० हजार ७२८ पुरुष, तर १ लाख २५ हजार ८३३ महिला मतदारांचा समावेश होता. सकाळी साडेसात वाजल्यापासून तालुक्यातील ३०५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली. साडेसात ते साडेनऊपर्यंत १६ हजार ५३९ पुरुष व ७ हजार २०३ महिला अशा एकूण २३ हजार ७४२ मतदारांनी मतदान केले. त्याची सरासरी ८.९१ टक्के इतकी होती. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये उत्साह होता. साडेअकरा वाजेपर्यंत ३७ हजार ४०२ पुरुष व २५ हजार ४२८ महिलांनी मतदान केले. एकूण ६२ हजार ८३० मतदान झाले. सरासरी २३.५७ टक्क्यांपर्यंत पोहोचली.
साडेअकरा वाजल्यापासून मतदानाची गती वाढली. दीड वाजण्याच्या सुमारास ५८ हजार ५२७ पुरुष, तर ४९ हजार ३३४ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण १ लाख ७ हजार ८६१ मतदान झाले. सरासरी ४०.४६ टक्के मतदान झाले. कांदलगावमध्ये ८६.३०टक्के मतदान झाले. येथे १३६८ पैकी ११७८ मतदारांनी मतदान केले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्र्यत ७४.८१ टक्के मतदान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळेल. जिल्हा परिषदेच्या पाच ते सहा तर पंचायत समितीच्या नऊ ते अकरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, असा दावा पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा काँग्रेस पक्ष जिंकेल. इंदापूर पंचायत समितीवरील काँग्रेसची सत्ता अबाधित राहील असा विश्वास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.कृष्णाजी यादव यांनी व्यक्त केला आहे. कळस व परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत ८० टक्के मतदान झाले. कळस व परिसरातील बिरंगुडी ,बागवाडी, पिलेवाडी, गोसावीवाडी मध्ये एकूण ५ हजार ४५१ मतदार आहेत. त्या पैकी ४ हजार ३३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी होती. दुपारनंतर मतदान चांगले झाले. बोरी गावामध्ये एकूण ४ हजार ४३७ मतदार आहेत. त्या पैकी ३ हजार २३३ मतदारांनी मतदान केले. तेथे सुमारे ७३ टक्के मतदान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लाखेवाडी गणातील उमेदवार, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रदीप जगदाळे यांच्या सराटी या गावात ८१ टक्के मतदान झाले. १ हजार २७५ मतदारांनी मतदान केले. वडापूरी येथे ७५ टक्के मतदान झाले. २ हजार १७८ मतदारांपैकी २ हजार ३८५ मतदारांनी मतदान केले. (वार्ताहर)