मतदान केंद्रांची यादी गायब
By Admin | Published: October 7, 2014 06:57 AM2014-10-07T06:57:55+5:302014-10-07T06:57:55+5:30
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त २०४ मावळ, २०७ भोसरी व २०८ वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची यादी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
पिंपरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्रांच्या यादीतील जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त २०४ मावळ, २०७ भोसरी व २०८ वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची यादी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना अखेरच्या टप्प्यात नोंदणी केलेल्याची पुरवणी मतदार यादीही उपलब्ध झालेली नाही. सर्वसामान्य मतदारांना व कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाबत अचूक माहिती मिळत नसल्याने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही .
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचा संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रम गेल्या तीन महिन्यात राबविला होता. जून महिन्यापासून मतदारयादीत दुरुस्ती मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच विधानसभा निवडणूक बारा सप्टेंबरला जाहीर झाल्यानंतर सत्तावीस सप्टेंबरअखेर मतदार यादीत नाव नोंदणीची अखेरची संधी दिली होती. मात्र आजतागायत ( सोमवार ) संकेतस्थळावर पुरवणी मतदार यादीही उपलब्ध झालेली नाही, असे नवीन नाव नोंदणी केलेल्या मावळ व चिंचवड मतदारसंघांतील अनेक नव मतदारांनी सांगितले. (वार्ताहर )