डॅशबोर्डवर आता खासगी ‘सीसीसी’ची यादी, बेडची उपलब्धता समजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:13+5:302021-05-12T04:12:13+5:30
पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोरोनाबाधितांसाठी बेडची उपलब्धता दाखविणाऱ्या डॅशबोर्डवर, शहरातील ३७ खासगी कोविड केअर सेंटर (सीसीसी) यांचाही ...
पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोरोनाबाधितांसाठी बेडची उपलब्धता दाखविणाऱ्या डॅशबोर्डवर, शहरातील ३७ खासगी कोविड केअर सेंटर (सीसीसी) यांचाही समावेश महापालिकेकडून करण्यात आला आहे़
शहरात काही खासगी कोविड केअर सेंटर कोरोनाबाधितांना विलगीकरणासाठी दाखल करून घेताना, पुणे महापालिकेची मान्यता असल्याचे खोटे सांगत होते. पण महापालिका मान्यताप्राप्तच सीसीसीचा समावेश डॅशबोर्डवर केलेला होता. इतर सीसीसीच्या बेडची आकडेवारी नव्हती. पण आता या निर्णयामुळे शहरात कोणते सीसीसी मान्यताप्राप्त आहेत व कोणते नाही याची माहिती नागरिकांना समजणार आहे़
शहरातील काही खासगी सीसीसीवर महापालिकेचे अथवा आरोग्य यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही़ तसेच या ठिकाणी रुग्णांना कोणते उपचार दिले जातात, त्यांच्या उपचारासाठी एमबीबीएस डॉक्टर आहेत की नाही़ तेथील सुविधा व रुग्णांची सुरक्षितता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे़
दरम्यान महापालिकेच्या चार सीसीसीमध्ये सध्या बाराशे बेडची उपलब्धता असून, यापैकी ७८८ बेड मंगळवारी रिक्त होते़ त्यामुळे कोरोनाबाधितांना मोफत विलगीकरण कक्ष हवे की, सशुल्क कक्ष हा निर्णय त्या रुग्णांनी घ्यावयाचा असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे़
----------------------
नियम न पाळणास कारवाई - रूबल अग्रवाल
शहरात काही जण महापालिकेची मान्यता न घेताच सीसीसी सुरू करून, आम्ही परवानगी घेतली असल्याचे खोटे सांगून रुग्णांना दाखल करून घेत होते़ या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने मान्यता दिलेल्या सीसीसीची यादी डॅशबोर्डवर प्रसिद्ध केली आहे़ दरम्यान या सर्व सीसीसींची पाहणी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होत असून, येथे आवश्यक सुविधा व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्ग आहे की नाही, याची तपासणीही होत आहे़ तसेच महापालिकेने मान्यता देताना घालून दिलेले नियम या सीसीसीमध्ये पाळले जात नसतील, तर त्या सीसीसीची परवानगी रद्द करून त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली़
-------------------------------