विद्यार्थ्यांना प्रतीक्षा वसतिगृहाच्या यादीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:06 AM2018-07-23T00:06:45+5:302018-07-23T00:07:21+5:30
गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही ‘मागेल त्याला वसतिगृह’ देण्याची योजना पूर्ववत राबविली जाण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशासाठी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसमोर वसतिगृहातील खोल्यांचे वाटप होईपर्यंत कुठे राहायचे हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे विभागांकडून जाहीर होणाऱ्या वसतिगृहातील प्रवेशाच्या यादीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही ‘मागेल त्याला वसतिगृह’ देण्याची योजना पूर्ववत राबविली जाण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या ५२८, तर मुलींच्या ४०८ खोल्या उपलब्ध आहेत. मागील वर्षी वसतिगृहामध्ये १ हजार ६७ मुलांना व १ हजार १२२ मुलींना अशा एकूण २ हजार १८९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. विद्यापीठामध्ये एकूण ५२ विभाग असून, या विभागांच्या विद्यार्थी संख्येनिहाय लॉटरी पद्धतीने त्यांना वसतिगृहातील खोल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
सरासरी प्रत्येक विभागाला मुलांच्या दहा व मुलींच्या दहा खोल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या त्या विभागांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीतील क्रमांकाने या खोल्यांमध्ये प्रवेश द्यायचा आहे. त्यामुळे विभागांनी वसतिगृह प्रवेशाच्या याद्या त्वरित जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
विभागांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन वसतिगृह मिळण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. या काळात बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांपुढे कुठे राहायचे, हा प्रश्न निर्माण होतो. पूर्वी विद्यार्थी पॅरासाइट म्हणून मित्रांकडे राहू शकत होते, मात्र आता बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर पॅरासाइट म्हणून विद्यार्थ्यांची सोय होण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर चलन भरून तात्पुरती राहण्याची विद्यार्थी व विद्यार्थिनींची सोय करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वसतिगृहातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे येणारे अर्ज व प्रत्यक्ष उपलब्ध खोल्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. एका खोलीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येनुसार वसतिगृहांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफआय) विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष सतीश देबडे, उपाध्यक्ष अक्षय रघतवान यांनी कुलगुरूंकडे केली आहे.
नवीन वसतिगृहांच्या उभारणीची तातडीने गरज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलांसाठी ९ व मुलींसाठी ९ वसतिगृहांच्या इमारती आहेत. विद्यापीठातील विभागांची तसेच विद्यार्थ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढत गेली, त्या प्रमाणात वसतिगृहांची संख्या वाढलेली नाही. मुलींच्या वसतिगृहाची नवीन इमारत बांधण्यास मंजुरी मिळालेली आहे. त्याचबरोबर मुलांच्या पीएचडी वसतिगृहाच्या मान्यतेचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ही वसतिगृहे बांधण्याची कार्यवाही तातडीने सुरू होण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
जुन्या इमारतींच्या डागडुजीची गरज
मुलांच्या वसतिगृह क्रमांक ५ मधील काही खोल्यांमध्ये गळती होत असल्याने दुरुस्तीसाठी हे वसतिगृह खाली करण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांची वसतिगृहाची गरज लक्षात घेऊन ते पुन्हा वापरात आणण्यात आले आहे. मुलांच्या वसतिगृह क्रमांक ५ बरोबरच वसतिगृह क्रमांक १, २ व ६ च्या इमारतीही खूप जुन्या झाल्या आहेत. या इमारती खाली करून त्या ठिकाणी नवीन इमारतींची उभारणी करावी लागणार आहे. त्याबाबतचे नियोजन व जुन्या इमारतींची डागडुजी तातडीने करण्याची आवश्यकता आहे.