Pune: माझे ऐक, नाहीतर एकतरी मर्डर करतोच, धमकी दिल्ली त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 10:02 AM2023-06-28T10:02:15+5:302023-06-28T10:02:41+5:30
Pune Crime News: पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी माथेफिरू तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे शहर थरारले.
पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी माथेफिरू तरुणाने तरुणीवर कोयत्याने केलेल्या हल्ल्यामुळे शहर थरारले. पीडित तरुणी परीक्षा असल्याने बसने ग्राहक पेठ येथे उतरली. त्यावेळी शंतनू समोर होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने तुझ्याशी बोलायचे नाही, आईशी बोल, असे सांगितले. तरुणीने तिच्या दुसऱ्या मित्राला बोलावून घेतले.
तरुणी मित्राच्या दुचाकीवरून जाऊ लागताच शंतनूने तिचा हात धरून ‘माझे ऐक नाही तर तुला आज मारूनच टाकतो, आज एकतरी मर्डर करतोच’, अशी धमकी दिली. धमकी ऐकून तरुणीच्या मित्राने दुचाकी थांबविली. तोपर्यंत शंतनूने बॅगेतून कोयता काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्याने वार चुकवला आणि तो पळाला. त्यानंतर शंतनूने मोर्चा तरुणीकडे वळविला. तो तिच्या डोक्यात वार करणार, तितक्यात खाली पडली. शंतनूचा वार मनगटाला लागला. शंतनूला ढकलून ती पळू लागली. तोपर्यंत लोक जमले. तेव्हा त्याने त्यांच्यावर कोयता उगारला. तरीही, त्यातील काही जणांनी त्याला पकडले. लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिस चौकीत नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदाशिव पेठेतील घटना अतिशय धक्कादायक आहे. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला असला, तरी अशा माथेफिरूंना जरब बसावी, यासाठी नव्याने फिक्स पॉइंट तयार करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज, विविध क्लास आहेत, तरुण-तरुणींची एकत्र येण्याची ठिकाणे आहेत, त्या-त्या ठिकाणची गस्त वाढविण्यात येणार आहे.
- रितेशकुमार,
पोलिस आयुक्त, पुणे शहर
मी दुकानामध्ये काम करीत होतो. माझं लक्ष अचानक एका मुलीकडे गेलं. ती पेरुगेट पोलिस चौकीच्या दिशेने पळत आली. तिच्या मागे एक मुलगा पळत आला. त्याच्या हातात कोयता होता. त्याने त्या मुलीवर वार करण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा वार तिच्या हातावर झाला. हे दिसताक्षणी मी धावत तिथे गेलो. माझ्यासोबत एक मुलगा होता.
त्याने त्या मुलाला पकडले. मी त्या मुलीला धीर देत पोलिस चौकीमध्ये नेले. तेथे कोणी नव्हते. मग, आम्ही पोलिस चौकीचे दार आतून लावून घेतले. काही वेळाने पोलिस तेथे पोहोचले.
- गजानन सूर्यवंशी, प्रत्यक्षदर्शी