Pune: पुण्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण; खड्ड्यांसाठी ६ वर्षांत २,१८० कोटींचा खर्च गेला कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 04:15 PM2023-07-30T16:15:59+5:302023-07-30T16:16:09+5:30
दरवर्षी संपूर्ण शहरातील रस्ते तयार करणे आणि रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च
पुणे : शहरातील रस्त्यांवर गेल्या सहा वर्षांत सुमारे २,१८० कोटींचा खर्च केला आहे; पण सध्या पुण्यातील रस्त्यांची अवस्था बघितली, तर हे कोट्यवधी रुपये नेमके कुठे खर्च झालेत की खर्च झालेच नाहीत? त्यात काही काम न करता बिले काढली गेली आहेत का? याबाबत महापालिकेतील मावळत्या कारभाऱ्यांनीच शंका उपस्थित करून, रस्त्याची कामे झाली की नाहीत? याची तपासणी त्रयस्त यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) महापालिकेतील माजी नगरसेवक प्रशांत बधे, माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी यांनी पत्र लिहून सहा वर्षांतील रस्त्यांवर महापालिकेने खर्च केलेल्या रकमेचा तपशील सादर केला आहे.
महापालिका प्रशासन दरवर्षी संपूर्ण शहरातील रस्ते तयार करणे आणि रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च करते. तरीही पावसाने शहरातील बहुतांश सर्व रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे महापालिकेच्या कारभारावर सर्व स्तरांतून टीका होत असून, रस्त्यांवर केला जाणारा कोट्यवधींचा खर्च नक्की जातो तरी कुठे, असा प्रश्न पडू लागला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामांची त्रयस्त संस्थेकडून तपासणी होणे जरुरीचे आहे. तसेच पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रत्येक वर्षी डांबरीकरण केलेले रस्ते आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची यादी प्रसिद्ध करणे गरजेचे असून, त्याबरोबरच प्रत्येक प्रभागाने मेंटेनन्ससाठी काय काम केले त्याचादेखील तपशील जाहीर केला पाहिजे, अशी मागणीही या माजी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
रस्ते आणि रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी खर्च
वर्ष खर्च
२०१७-१८ ४२३ कोटी
२०१८-१९ ४३८ कोटी
२०१९-२० ३०५ कोटी
२०२०-२१ ४५३ कोटी
२०२१-२२ ३६१ कोटी
२०२२-२३ २०० कोटी