साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीत चुरस
By admin | Published: September 1, 2015 04:07 AM2015-09-01T04:07:40+5:302015-09-01T04:07:40+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्रीपाल सबनीस आणि प्रकाशक अरुण जाखडे यांनी सोमवारी अर्ज दाखल केले.
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्रीपाल सबनीस आणि प्रकाशक अरुण जाखडे यांनी सोमवारी अर्ज दाखल केले.
ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, रवींद्र शोभणे, डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी यापूर्वी अर्ज दाखल केले आहेत. जाखडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून श्रीधर माडगूळकर यांची स्वाक्षरी असून डॉ. मनोहर जाधव, रमेश राठिवडेकर, संतोष शेणई, सु. वा. जोशी, अनिल कुलकर्णी यांची स्वाक्षरी आहे. डॉ. सबनीस यांच्या अर्जावर के. रं. शिरवाडकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली असून विद्या बाळ, स्नेहल तावरे, मनोहर सोनवणे, सदाशिव शिवणे यांची स्वाक्षरी आहे.
कोल्हापुरातील दक्षिण साहित्य संघाचे चंद्रकुमार नलगे आज (दि. १) पुण्यात अर्ज भरण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज दाखल करता येतील, तर माघारीची मुदत ९ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार असून, दि. १५ पासून मतपत्रिका रवाना केल्या जाणार आहेत.
मोरे यांच्या सबनीसांना शुभेच्छा
अध्यक्षपदासाठी श्रीपाल सबनीस यांनी अर्ज भरला, त्या वेळी डॉ. सदानंद मोरे साहित्य परिषदेत उपस्थित होते. सबनीस यांनी उमेदवारीसंदर्भात भूमिका जाहीर केल्यानंतर डॉ. मोरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी मोरे म्हणाले, ‘‘गेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सबनीस यांनी व्यक्तिगत प्रश्न न करता वेगळी भूमिका घेऊन आपल्याला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत माझ्याही त्यांना शुभेच्छा असतील.’’
(प्रतिनिधी)