साहित्य संमेलन १५ जानेवारीपासून
By admin | Published: November 27, 2015 03:37 AM2015-11-27T03:37:48+5:302015-11-27T03:37:48+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले ८९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. ‘ज्ञानपीठकारांशी संवाद’ हे या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले ८९वे अखिल भारतीय साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. ‘ज्ञानपीठकारांशी संवाद’ हे या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य राहील, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे. ‘उद्योग आणि साहित्य’ असा मध्यवर्ती विषय असलेल्या या दिंडीत पिंपरी-चिंचवड येथील कंपन्यांमधील उद्योजक व कामगारही सहभागी होणार आहेत. सायंकाळी संमेलनाचे मावळते अध्यक्ष सदानंद मोरे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करतील. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. १८ रोजी संमेलनाची सांगता होईल.
यंदाच्या साहित्य संमेलनात स्त्रीसाहित्यावर आधारित ४-५ परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. १९८०नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे, माध्यमातील स्त्रीप्रतिमा आणि भारतीय संस्कृती, श्रमिक महिलांच्या व्यथा आणि लेखकांच्या कथा, हे परिसंवाद होणार आहेत. ‘मराठी समीक्षा किती संपन्न, किती थिटी?’, ‘मराठी वाङ्मयातील पुरस्कारांचे सांस्कृतिक आणि सामाजिक स्थान’, ‘आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते?’, ‘अभिरुचीसंपन्न विनोद आणि आजचे मराठी साहित्य’, ‘मराठी साहित्यातील उद्योगजगताचे चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक’, ‘बालसाहित्य आणि बालरंगभूमी सकस आहे का?’ हेही परिसंवाद होतील.
सासवडमधील साहित्य संमेलनामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेला ‘अभिजात कथांचे वाचन’ हा आगळावेगळा कार्यक्रम रसिकांच्या मागणीस्तव यंदाही संमेलनात समाविष्ठ करण्यात आला आहे. ह. ना. आपटे यांच्या पहिल्या कथेला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दोन विशेष कार्यक्रम सादर करण्यात येतील. कथाकथनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
आशा भोसले, अशोक हांडे, गुलजार, शरद पवार, रघुनाथ माशेलकर यांची संमेलनाला विशेष उपस्थिती असणार आहे.
संमेलनास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या रसिकांची चार दिवसांची भोजन तसेच निवास व्यवस्था संयोजकांतर्फे केली जाणार आहे. त्यासाठी १,२०० व २,००० रुपये प्रतिनिधी शुल्क असून, नोंदणी अर्जाची शेवटची मुदत ३० डिसेंबर असेल.
प्रतिनिधी शुल्क आणि ग्रंथप्रदर्शनातून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.