साहित्यिकांनी मते थोपवू नयेत : न. म. जोशी
By admin | Published: February 22, 2015 12:43 AM2015-02-22T00:43:01+5:302015-02-22T00:43:01+5:30
साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात.
पुणे : साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. त्यामुळे समाजातील काही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींबद्दल कधीही स्पष्टपणे न बोलता लेखनातून फटकारे मारले. त्यांना हेच जास्त झोंबते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
निनाद संस्थेतर्फे डॉ. जोशी यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानयोगी गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत आलेले अनुभव, आठवणी उपस्थितांसमोर दिलखुलासपणे मांडल्या. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी नगरसेवक दिलीप काळोखे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, डॉ. दिलीप गरूड, चंद्रकांत सणस, शुभदा जोशी, उदय जोशी अनिल गानू आदी उपस्थित होते. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीतून डॉ. जोशी यांचा जीवनप्रवास उलगडला.
डॉ. जोशी म्हणाले, ‘‘सध्याची शिक्षणपद्धती कृत्रिम आहे. सध्या शिक्षक मुलांना शब्दार्थ नव्हे; तर शब्दांचे प्रतिशब्द शिकवितात. तंत्रज्ञानाचे माणुसकीवर आक्रमण होत असून त्याचा अतिरेक होऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीची आठवणही डॉ. जोशी यांनी या वेळी सांगितली.’’
डॉ. जोशी यांचा गौरव करताना बापट म्हणाले, ‘‘न. म. म्हणजे ‘न’त ‘म’स्तक व्हावे, असे व्यक्तिमत्त्व आहे. स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व स्तरांतील लोकांना करून देत असताना
त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद दिसतो.’’
‘‘शिक्षक समाजाचे नेतृत्व करीत असल्याचा एक काळ होऊन गेला. आज ही परंपरा खंडित झाली आहे,’’ अशी खंत डॉ. मुजुमदार
यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)