साहित्यिकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने द्या, साहित्य परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:36 PM2018-04-09T12:36:10+5:302018-04-09T12:36:10+5:30
'साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता अध्यक्षपद सन्मानाने ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात यावे, यासाठी आद्य साहित्य संस्था म्हणून महामंडळात साहित्य परिषदेने आग्रही भूमिका घ्यावी, असा महत्वपूर्ण ठराव नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाची आर्थिक वर्षातील पहिली बैठक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यात फलटण येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा ठराव सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी मांडला. या बैठकीला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्यासह सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, प्रा. विक्रम आपटे, प्रा. रवींद्र कोकरे, अमर शेंडे, महादेव गुंजवटे, बापूसाहेब मोदी उपस्थित होते. कार्यकारी मंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रा.जोशी म्हणाले, 'साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या बाबतची आग्रही भूमिका मातृसंस्था म्हणून साहित्य परिषद घेईल.
आर्थिक दृष्टया दुर्बल पण उपक्रमशील शाखांना आर्थिक मदत
पुढील वर्षापासून शाखा मेळावा साधेपणाने घेण्यात येणार असून त्यासाठीची संकल्पित रक्कम उपक्रमशील पण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पाच मसाप शाखांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील तज्ञ परीक्षकांची होणार नेमणूक
सध्या साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाºया वार्षिक वाङ्मयीन पुरस्कारासाठी पुणे आणि परिसरातील तज्ञ व्यक्तींचीच परीक्षक म्हणून नेमणूक केली जाते. पुढील वर्षापासून मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्व जिल्ह्यातील तज्ञ व्यक्तींची परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येईल.
शाळकरी विद्यार्थ्यांचा साहित्य संस्कृतीसाठी हातभार
जेथे शाखा तेथे बैठक या निर्णयानुसार ही बैठक फलटणला घेण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेने या बैठकीचे आयोजन केले होते. महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटण आणि श्रीराम विद्याभवन फलटणच्या शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी परिषदेच्या मराठी भाषा संवर्धनासाठीच्या विविध उपक्रमासाठीची देणगी महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप सिह भोसले आणि नूतन नगरसेवक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते परिषदेचे कार्याध्यक्ष जोशी यांच्याकडे सुपुर्द केली.