साहित्य-संस्कृती कोणत्याही एका धर्माची नसते मक्तेदारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:33 PM2019-09-25T13:33:32+5:302019-09-25T13:36:06+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेसह काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे....

Literature and culture are not monopolies of any religion | साहित्य-संस्कृती कोणत्याही एका धर्माची नसते मक्तेदारी 

साहित्य-संस्कृती कोणत्याही एका धर्माची नसते मक्तेदारी 

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी संस्कृतीशी इमान राखून त्यांनी केलेली निवड योग्यमहाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन तातडीने त्यांची निवड थांबवावी, अशी मागणी

पुणे : उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेसह काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मात्र, विरोध करणाऱ्यांनी दिब्रिटो यांचे साहित्य वाचले आहे का, आजवर साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे का, असा प्रश्न साहित्य वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. मराठी साहित्य-संस्कृती ही कोणत्याही एका जात-धर्माची मक्तेदारी नाही, असे सांगत दिब्रिटोंना विरोध हे केवळ प्रसिद्धीतंत्र असल्याचे मतही व्यक्त होत आहे. 
साहित्य महामंडळाच्या बैैठकीत एकमताने संमेलनाध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांनी विरोध दर्शवला. ‘‘फादर दिब्रिटो पुरोगामी कंपूत राहून चलाखीने ख्रिस्ती धर्मप्रचार करत आले आहेत. पण त्यांनी ख्रिस्ती धर्मछळ, अंधश्रद्धा यावर टीका केली आहे काय?’’ असा प्रश्न उपस्थित करून दवेंनी उस्मानाबाद येथील संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. ‘‘विशिष्ट धर्माची उपाधी धारण केलेली व्यक्ती अध्यक्ष कशी होऊ शकते, त्यांनी आजवर प्रलोभनातून केल्या जाणाऱ्या ख्रिस्ती धर्मांतराचा विरोध का केला नाही?’’ असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे सह प्रांतमंत्री संजय मुरदाळे यांनी उपस्थित केला आहे.
‘लोकमत’शी बोलताना माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘साहित्य महामंडळाच्या ज्या १९ सभासदांनी दिब्रिटो यांच्या नावाची एकमताने निवड केली, त्यातील एकही ख्रिश्चनधर्मीय नाही; किंबहुना सर्वच जण हिंदू आहेत. मराठी संस्कृतीशी इमान राखून त्यांनी केलेली निवड योग्य आहे. भारतीय संविधान कोणताही धर्म मानत नाही.’

...............

फादर दिब्रिटो यांचे आजवरचे लेखन पाहिले असता मराठी साहित्यातील कोणता विचार त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवला, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांची आजवरची सर्व पुस्तकं ही ख्रिस्ती धर्मावर आधारित आणि ख्रिस्ती धर्म हा इतर धर्मापेक्षा कसा चांगला आहे, यावरच आधारित आहेत. ज्याप्रमाणे मदर तेरेसा यांचे काम ख्रिस्ती धर्मवाढीसाठी होते, तसेच दिब्रिटो यांचे लेखनही ख्रिस्ती धर्मासाठी आहे. दिब्रिटो यांच्याकडे थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी स्वत:हून हे पद स्वीकारू नये. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन तातडीने त्यांची निवड थांबवावी, अशी मागणी आहे. - आनंद दवे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते 
..........
राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी धर्मांध कृती भाजपच्या राष्ट्रवादाविरोधात आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. राष्ट्र, संविधान, साहित्याला धर्म नसतो. दिब्रिटो यांनी धर्मप्रचाराचे, अंधश्रद्धा प्रसाराचे काम केले असे ज्यांना वाटते, त्यांनी लेखनस्वातंत्र्याचा उपयोग करुन प्रतिवाद करावा. स्वतंत्र साहित्य संमेलन घेऊन स्वत:चे विचार जाहीर व्यासपीठावर मांडावेत.- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष.
.............
आळंदी प्रतिष्ठानतर्फे मागील वर्षी पसायदान साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ‘माझा धर्म आणि पसायदान’ या विषयावर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उद्बोधक विचार मांडले होते. दिब्रिटो यांची भूमिका व्यापक उदारमतवादाची आहे. आपला धर्म पाळून त्यांनी मराठी साहित्याची सेवा केली आहे. त्यांचे लेखन दर्जेदार आणि वाचनीय असते. कृतिशील लेखकाची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड स्वागतार्ह आहे. त्यांच्या निवडीला होणारा विरोध अर्थहीन आणि अयोग्य आहे.- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष
..............
सोशल मीडियावरील पोस्ट 
आता ‘मसाप’ने ‘फादर’ हा शब्द निमंत्रण पत्रिकेतून काढावा तो धार्मिकतेशी संबंधित आहे. ह्या मतलब्यांना मा. शेषराव मोरे धर्मांध म्हणून नाही चालले, मग हा पाद्री धार्मिक दलाल बरा चालला.सगळ्यांनी संमेलनावर बहिष्कार टाकावा. यात ते पाद्री आहेत म्हणून बहिष्कार नाही, तर धर्मप्रसारक आहेत म्हणून विरोध. 

Web Title: Literature and culture are not monopolies of any religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.