साहित्य हे समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब, विवेकवादी विवेचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:03 AM2019-02-23T02:03:58+5:302019-02-23T02:04:20+5:30
सम्यक साहित्य संमेलन: ‘मी आणि माझे लेखन’ यावर परिसंवाद
पुणे : ‘साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब, विवेकवादी विवेचन असते’,
असा सूर ‘मी आणि माझे लेखन’ या परिसंवादात व्यक्त झाला. सम्यक साहित्य संमेलनातील परिसंवादात युवा कवी सुदाम राठोड, लेखक
राकेश वानखेडे, श्रीकांत देशमुख,
सुरेश पाटोळे, इंदुमती जोंधळे, वृषाली मगदूम सहभागी झाले होते. मंगेश काळे हे अध्यक्षस्थानी होते. राठोड म्हणाले, ‘भाषेवरील प्रभुत्व आणि भावनिक राजकारण करता आले म्हणजे चांगली कविता करता येते असे नाही. त्यासाठी विवेक आणि जाणिवा जाग्या असाव्यात. साहित्याला वैश्विक होण्यासाठी दलित साहित्याची गरज पडली. कारण यात वेदना, संताप याबरोबरच विवेकाची जोड होती. सतत आक्रोश, वेदना, विद्रोह हेच म्हणजे दलित साहित्य ही संज्ञा होणे चुकीचे आहे.’
जोंधळे म्हणाल्या, ‘जीवनासाठी, भलबुरेपणासाठी, आणि काय चालले आहे हे समजण्यासाठी कलेचा उपयोग व्हायला हवा. माझ्या लेखनाची नाळ जीवनाशी जोडली आहे. आजूबाजूला जे घडत आहे ते बघताना कोणताही संवेदनशील माणूस शांत बसूच शकत नाही. अनुभूतीच्या जाणिवांचा तसेच चिंतन, मनन आणि माणुसकीचा ओलावा लेखनात असायलाच हवा.’
काळे म्हणाले, ‘प्रत्येकाने सुरुवातीच्या काळात संतापी असावे आणि स्थिरावले की संशयी व्हावे म्हणजे लेखन फुलते. कोणत्याही साहित्यनिर्मितीसाठी रियाज आवश्यक असतो.’ माणसाच्या वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृती मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनातून करतो, असे पाटोळे यांनी सांगितले.
‘कवी, लेखक वंचितांविषयी बोलत असतात. त्यामुळे कलावंत, साहित्यिक यांना केंद्रस्थानी ठेवले तरच सुधारणा होऊ शकते. ज्यांना चेहरा नाही, अशांविषयी ते लिहितात. जगण्याचे उर्ध्वपातन म्हणजे लेखन असते.’
-देशमुख म्हणाले
‘भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार म्हणजे साहित्य. मी जे अनुभवत गेले, बघत गेले त्यातून माझे लेखन सुरू झाले. एखाद्या स्त्रीच्या समस्येसाठी आंदोलने, संघर्ष, मोर्चे करताना मी फार अस्वस्थ असे. पण एकदा तो प्रश्न सुटला की मी भावनांचा निचरा कथा लेखनातून करते.’
-मगदूम म्हणाल्या
‘आजचा समाज, समस्या यांचे आकलन, वाचन आणि त्यावर तुमचे भाष्य हे तुमचे लेखन असते. कादंबरी हा लोकशाहीशी हातात हात घालून चालणार प्रकार आहे.’ -वानखेडे म्हणाले