साहित्य, पर्यावरणाचा अनोखा मिलाफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 12:25 AM2016-01-06T00:25:34+5:302016-01-06T00:25:34+5:30
ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट अशा विविध कारणांमुळे पर्यावरणावर सततचे आघात होत आहेत. या आघातांवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य विविध पातळ्यांवर होणे आवश्यक आहे
पुणे : ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट अशा विविध कारणांमुळे पर्यावरणावर सततचे आघात होत आहेत. या आघातांवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य विविध पातळ्यांवर होणे आवश्यक आहे. यातील एक चळवळ म्हणून स.प. महाविद्यालयात ८ जानेवारी रोजी पर्यावरणप्रेमी
साहित्य संमेलन आयोजित करण्यात
आले आहे. वनस्पतिशास्त्राच्या
ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. हेमा
साने या संमेलनाच्या अध्यक्षा
आहेत.
किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौैथे पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन दि. ८ जानेवारी रोजी सप महाविद्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात
आली. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैैद्य, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, वीरेंद्र चित्राव, सुनील महाजन, प्रकाश पायगुडे आदि मान्यवर उपस्थित होते.
दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ. हेमा साने यांच्या हस्ते पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे.
यावेळी त्यांच्या ‘एनव्हायर्नोमेंटल फ्रेंडली लाईफस्टाईल’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि ‘पर्यावरणस्रेही जीवनशैैली’ या विषयांवर प्रगट मुलाखत होणार आहे.
यावेळी दिलीप शेठ म्हणाले, ‘पर्यावरणाच्या -हासामुळे जगण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक चळवळींना प्रोत्साहन देणे आवश्यक
आहे. यादृष्टीने सप महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. निसर्गाच्या बाबतीत एक एक व्यक्ती जागरुक झाली तर संपूर्ण समाज जागरुक होईल, या विचारातून पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.’
वीरेंद्र चित्राव म्हणाले, ‘संमेलनात प्लास्टिक कचरा एकत्र करुन त्यापासून तयार होणाऱ्या पेट्रोलियम निर्मितीचे तंत्र प्रात्यक्षिकातून दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीची कंपनी पुण्यात येऊन पहिल्यांदाच एवढा मोठा उपक्रम राबवत आहे.
विद्यार्थ्यांना पर्यावरणप्रेमाला, साहित्याला वाव मिळावा यादृष्टीने संमेलनात प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरणविषयक साहित्यिक, लेखक, प्रकाशन यांची या माध्यमातून दखल घेतली जाणार आहे.’ (प्रतिनिधी)