साहित्य-कला म्हणजे राजकारण्यांना एकत्र आणणारा ‘माळकरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:07+5:302020-12-27T04:09:07+5:30
पुणे : “युरोप आणि अमेरिकेसारखे श्रीमंत देश राजकीय पक्ष संख्येच्या बाबतीत दरिद्री आहेत. पण आपल्या देशात असंख्य पक्ष आहेत. ...
पुणे : “युरोप आणि अमेरिकेसारखे श्रीमंत देश राजकीय पक्ष संख्येच्या बाबतीत दरिद्री आहेत. पण आपल्या देशात असंख्य पक्ष आहेत. या सर्वांना एकत्र आणणारा ‘माळकरी’ म्हणजेच साहित्य आणि कला होय,” असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विसाव्या साहित्यिक कलावंत संमेलनात ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांना आणि अभिनेते मोहन जोशी यांना ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव’ पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, गरवारे फायबर लिमिटेडचे संचालक श्रीधर राजपाठक, मकरंद पाचडे, अनिल देहडीराय, प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे आदी उपस्थित होते.
डॉ. आगाशे म्हणाले की, एका पातळीवर आपण सर्व एकत्र असल्याची व्यवस्था निसर्गाने केली आहे. कला, साहित्य लोकांना एकत्र आणते. परंतु व्यवसाय, राजकारण हे वेगळे करते. कोव्हिडमुळे आपली कल्पनाशक्ती वाढली आहे. मानवाला ‘व्हर्च्युअल’ जगायला आवडत आहे. तो मोबाईलमध्येच एकमेकांना भेटतोय. मात्र सर्वांगीण शारीरिक विकासासाठी, जीवन सुंदर होण्यासाठी कला, साहित्याचा वापर केला पाहिजे.
चौकट
“सर्व क्षेत्रात कष्टाशिवाय यश मिळत नाही. साहित्य, कला क्षेत्रही त्याला अपवाद नाही. स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याबरोबरच ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. कलावंत हा नेहमी भुकेलेला असतो. आपले नेहमी कौतुक व्हावे अशी त्याची इच्छा असते. कष्टाशिवाय ते होत नाही,” असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले. समाजातील दुर्बल घटकांचे आपण देणे लागत असल्याने मी देहदान करण्याचे ठरवले आहे. प्रत्येकाने देहदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट
“साहित्यात शब्दाला महत्व दिले जाते. लिखित शब्दाला ध्वनीची जोड मिळाली की तो जिवंत होतो. आपल्या मौखिक परंपरेने लिखित शब्दाला जागे केले आहे. त्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे. साहित्य परंपरेने एकीकडे सामाजिक बांधिलकी होत आहे. पण आपण अजूनही शक्तीवंत समाज म्हणून उभे राहिलो नाहीत. सर्वच क्षेत्रातील फुटीरता-राजकारण याला बळी पडत आहोत. स्वतःला सुशिक्षित समजतो. परंतु समूहशक्तीचा विसर पडला असल्याचा पुनर्वविचार करायला पाहिजे,” असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.