साहित्य महामंडळाची तारेवरची कसरत
By Admin | Published: November 10, 2015 01:38 AM2015-11-10T01:38:26+5:302015-11-10T01:38:26+5:30
साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते
पुणे : साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते. संमेलन पार पाडण्यासाठी हितसंबंध जोपासण्याची वेळ आयोजकांवर येते. ८९व्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी सत्कार समारंभातच ‘अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही’, असा सज्जड दम दिल्याने साहित्य महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
साहित्य संमेलनांना उत्सवी स्वरूप आल्याचे साहित्य परिषदेनेही मान्य केले आहे. साहित्याचा उत्सव साजरा करण्यात काही हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे व्यासपीठावर राजकारणी व्यक्तींची होणारी गर्दी हासुद्धा दर वर्षी वादाचा विषय असतो. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी व्यक्ती कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो. राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. पण, भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा करायला काही हरकत नाही.
पिंपरी येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य श्रीपाल सबनीस निवडून आले आहेत. या निमित्त प्रथेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिदषेने त्यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात सबनीस यांनी कळीच्या मुद्द्यालाच हात घातला.
संमेलनादरम्यान साहित्य संमेलनाध्यक्षांचा अवमान खपवून घेणार नाही, संमेलनाध्यक्षांचा अवमान म्हणजे महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेचा अवमान, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली आहे.
या संदर्भात सबनीस यांनी काही संदर्भ दिले आहेत. ते म्हणाले, ‘‘घुमानच्या संमेलनात उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षांना अंग चोरून उभे राहण्याची वेळ आली. ते बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांची खुर्ची इतरांनी बळकावली. संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे आहे. अध्यक्षांचा मान राखलाच गेला पाहिजे. ही बाब कुणाच्या लक्षात आली की नाही हे माहीत नाही, पण एक जागरुक नागरिक म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला.’’
सबनीस म्हणाले, ‘‘राजकारणी व्यक्तींनी व्यासपीठावर असू नये, असे मी म्हणत नाही. यशवंतरावांची परंपरा जपणाऱ्या राजकारणी व्यक्तींचे स्वागतच करू. संमेलनाध्यक्षांचा सन्मान राखणे ही महामंडळाचीच जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून परिषदेच्या घरगुती कार्यक्रमात व्यथा बोलून दाखविली.’’
(प्रतिनिधी)