उर्दू भाषेतील साहित्य भारतीय संस्कृती समृद्ध करणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:32+5:302021-01-22T04:11:32+5:30
पुणे : उर्दू भाषा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. काव्य हा उर्दूचा प्राणदिवाच आहे. त्यामुळे या भाषेतील हे साहित्य भारतीय ...
पुणे : उर्दू भाषा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. काव्य हा उर्दूचा प्राणदिवाच आहे. त्यामुळे या भाषेतील हे साहित्य भारतीय संस्कृतीला अधिक समृद्ध करणारे ठरले आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध चार्टर्ड अकौन्टन्ट व लेखक मिलिंद संगोराम यांच्या स्मृतिनिमित्त यावर्षी मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते तो नुकताच प्रदान केला. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या वेगळ्या विषयावरील ग्रंथाला हा पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो.
माजगावकर म्हणाले, अंबरीश हे एक संवेदनशील लेखक आहेत आणि त्यांच्या अभ्यासविषयांचा पल्लाही मोठा आहे. भवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यातील काव्य शोधण्याचा ध्यास यामुळे त्यांचे लेखन अधिक उठून दिसणारे असते.
यावेळी ‘हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ’ या विषयावर अंबरीश मिश्र यांचे सप्रयोग व्याख्यान झाले. प्रारंभी गंधार संगोराम यांनी मिलिंद यांच्या आठवणी सांगितल्या, डॉ. अपूर्वा संगोराम यांनी आभार मानले, तर सिद्धेश पूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी : ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांना मिलिंद संगोराम ग्रंथ पुरस्कार प्रदान करताना राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर. (डावीकडे) डॉ. अपूर्वा संगोराम.