मराठी शाळा टिकल्या तरच साहित्य टिकेल : डॉ. अनिल अवचट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:24 PM2019-06-14T14:24:03+5:302019-06-14T14:31:20+5:30

आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे.

litreature Can be saved when marathi schools live : Anil Avchat | मराठी शाळा टिकल्या तरच साहित्य टिकेल : डॉ. अनिल अवचट 

मराठी शाळा टिकल्या तरच साहित्य टिकेल : डॉ. अनिल अवचट 

Next
ठळक मुद्दे आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे संमेलनाध्यक्षांचे महासंमेलन

पुणे : आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती केविलवाणी झालेली आहे. मराठी शाळा कशा टिकवायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी शाळा जगल्या तरच भविष्यातील वाचक निर्माण होईल. वाचकच नसेल तर मराठी साहित्यही लिहिले होणार नाही. आताच पुस्तकांचा खप कमी होतो आहे, अशी पुस्तक विक्रेत्यांची तक्रार आहे. मराठी भाषेला चांगले दिवस दाखवून अत्रेचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. 
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान आणि विनोद विद्यापीठातर्फे आचार्य अत्रे स्मृती अर्ध शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संमेलन अध्यक्षांचे महासंमेलनात अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल अवचट, मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील प्रतिमा परदेशी, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद लुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबुराव कानडे म्हणाले, ‘सरकारवर नियंत्रण ठेवणारी शक्ती नसल्याने आता अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाहीये. बोलके साहित्यिक खूप असतात, अत्रे कर्ते होते. बोलते आणि कर्ते साहित्यिक एकत्र आल्याशिवाय अभिजात दर्जा मिळणार नाही.’
कांबळे म्हणाले, ‘सामाजिक बहिष्कृततेचे जीणे हा सामाजिक द्वेष. दलित, पददलितांनी हा द्वेष हजारो वर्षे सहन केला. संत ज्ञानेश्वरही यातून सुटले नाहीत. त्यांनी घेतलेली संजीवन समाधी ही मी आत्महत्याच मानतो. सामाजिक दाहकतेचे विष त्यांना प्यावे लागले. त्यांनी ही खंत व्यक्त केली असती, बहिष्काराबाबत एखादे वाक्य लिहिले असते तरी मराठी वाड्मयाचे रुपडे पालटले असते. अत्रेंच्या काळातील लोक विवेकी होते. आजची मराठी मानसिकता ही खुरट्या झुडुपासारखी आहे.’
लुलेकर म्हणाले, ‘गांधीजी गेल्यानंतरही त्यांच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या जातात, ही विकृती आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आपल्याला सावध रहायला हवे. आता प्रत्येक जातीचे अहंकार जागे झाले आहेत. त्यामुळे काहीच बोलण्याची सोय राहिलेली नाही. पूर्वी वैचारिक लेखनाने राजकीय, सामाजिक नेतृत्व केले. आज वैचारिक लेखनच मराठी साहित्यात होत नाही. नव्याने इतिहास घडल्याशिवाय सांस्कृतिक परिवर्तन घडणार नाही.’
प्रतिमा परदेशी म्हणाल्या, ‘मराठी साहित्यात कायमच दुजाभाव होत आला आहे. साहित्य संस्थांमध्ये सारस्वतांचे राजकारण घडत आहे. सर्जनशील साहित्याची निर्मिती हा पहिला प्रवाह, तर शिक्षण मिळू न शकलेल्या स्त्रिया, बहुजन समाज यांनी लिहिलेले साहित्य हा दुसरा प्रवाह आहे. अत्रेंची विचारांवर, ध्येयावर निष्ठा होती. अत्रेंच्या पद्धतीने आज विचार केला तर नक्की बदल घडेल.’
 

Web Title: litreature Can be saved when marathi schools live : Anil Avchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.