Pune Rain: हिटपासून पुणेकरांना थोडाफार दिलासा; दुपारी अचानक पावसाची जोरदार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:37 PM2024-09-23T12:37:40+5:302024-09-23T12:38:01+5:30
सोमवारी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची अचानक दाखल झालेल्या पावसामुळे चांगलीच धांदल उडाली.
पुणे : माॅन्सून आता परतीच्या प्रवासाला निघाला असून, पुणे शहरात रविवारी (दि. २२) रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आणि रात्री पावणेदहा वाजता अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाला. आज मात्र सकाळापासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. अखेर दुपारी १२ च्या सुमारास मुसलदाहर पावसाला सुरुवात झाली. सोमवारी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची अचानक दाखल झालेल्या पावसामुळे चांगलीच धांदल उडाली.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस गायबच झाला होता; पण रविवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागांतून नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण आहे. या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. २३ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागांतून नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण असणार आहे. रविवारी राज्यात अनेक भागांत पाऊस झाला. तसेच येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांत, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तर कोकण विभागांमध्येही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २३ ते २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात, तर २३ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकण गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, तर २४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
पुण्यात जोरदार हजेरी...
पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब होता. तापमानातदेखील वाढ झाली होती. त्यामुळे चांगलीच उष्णता वाढली होती. रविवारी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पुणेकरांना अनुभवायला आला. आताही तेच झाले असून काही मिनिटांमध्येच रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसून आले आहे.