महावितरणच्या अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद,३८ लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६५ हजार ग्राहकांनीच घेतला लाभ

By नितीन चौधरी | Published: December 3, 2024 01:45 PM2024-12-03T13:45:52+5:302024-12-03T13:45:58+5:30

अल्प प्रतिसाद असल्याने या योजनेला मुदतवाढ देण्याची नामुष्की महावितरणवर आली

Little response to Mahavitaran Abhay Yojana, only 65,000 customers out of 3.8 lakh defaulters benefited | महावितरणच्या अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद,३८ लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६५ हजार ग्राहकांनीच घेतला लाभ

महावितरणच्या अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद,३८ लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६५ हजार ग्राहकांनीच घेतला लाभ

पुणे : बिलाच्या थकबाकीमुळे वीजजोड कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरणच्या अभय योजनेला ३१ डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात तब्बल ३८ लाख थकबाकीदार असताना या योजनेचा आतापर्यंत केवळ ६५ हजार ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे अल्प प्रतिसाद असल्याने या योजनेला मुदतवाढ देण्याची नामुष्की महावितरणवर आली आहे. नागपूर परिमंडळातील ७ हजार ५९२, कोल्हापूर परिमंडळातील ६ हजार १०१ आणि पुणे परिमंडळातील ५ हजार ८९३ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) राज्यातील ३८ लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ५ हजार ४८ कोटी रक्कम, तर १ हजार ७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख इतका विलंब आकार बाकी आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी महावितरणने १ सप्टेंबरला अभय योजना अंमलात आणली. त्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत राज्यातील केवळ ६५ हजार ४४५ वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून ८६ कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ४४ कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ झाला आहे.

नागपूर परिमंडळातील ७५९२ वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून हे परिमंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर परिमंडळातील ६ हजार १०१ आणि पुणे परिमंडळातील ५ हजार ८९३ ग्राहकांनी लाभ घेत ही परिमंडळे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महसूल विभागांचा विचार केल्यास नागपूर विभागात २० हजार ४०० लाभार्थी असून कोकण विभागात १७ हजार ७९८ तर पुणे विभागात १७ हजार ४४८ व छत्रपती संभाजीनगर विभागात ९ हजार ८१८ लाभार्थी आहेत.

या योजनेतून पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७४ वीजग्राहकांना फायदा होणार असून मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे एकूण ७३ कोटी १४ लाख रुपये माफ होणार आहेत. मात्र, पुणे परिमंडळातही केवळ ५ हजार ८९३ ग्राहकांनीच याचा लाभ घेतला आहे. या योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीजजोड घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीजजोड घेण्याचीही सुविधा असेल.
 

या योजनेअंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा. - लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण

Web Title: Little response to Mahavitaran Abhay Yojana, only 65,000 customers out of 3.8 lakh defaulters benefited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.