वृद्धेच्या वाट्याला खुराड्यातील जीणे

By Admin | Published: June 15, 2016 05:08 AM2016-06-15T05:08:20+5:302016-06-15T05:08:20+5:30

वय वर्षे ६५. खुब्याची शस्त्रक्रिया झालेली. पायाने अधू अशा परिस्थितीत जिन्याच्या पायऱ्या चढणे-उतरणे कठीण असल्याने साखरबाई सोपान शिंदे ही वृद्ध महिला वर्षभरापासून सहाव्या

Live in the pocket | वृद्धेच्या वाट्याला खुराड्यातील जीणे

वृद्धेच्या वाट्याला खुराड्यातील जीणे

googlenewsNext

पिंपरी : वय वर्षे ६५. खुब्याची शस्त्रक्रिया झालेली. पायाने अधू अशा परिस्थितीत जिन्याच्या पायऱ्या चढणे-उतरणे कठीण असल्याने साखरबाई सोपान शिंदे ही वृद्ध महिला वर्षभरापासून सहाव्या मजल्यावरून खाली येऊ शकली नाही. महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पिंपरीतील मिलिंदनगर येथे घर मिळाले. वृद्ध, अपंग लाभार्थ्यांना प्राधान्याने खालच्या मजल्यावर सदनिका देण्याचे महापालिकेचे धोरण असताना, साखरबाई यांना साई संतोष हौसिंग सोसायटीत सहाव्या मजल्यावरील घर मिळाले. सुरुवातीचे दोन-तीन महिने लिफ्ट सुरू होती. नंतर ती बंद झाली. तेव्हापासून साखरबार्इंच्या वाट्याला खुराड्यातील जीणे आले. मोकळ्या हवेतील श्वास कधी मिळणार या आशेवर त्या आहेत.
महापालिकने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत साखरबार्इंना सहाव्या मजल्यावर सदनिका दिली. पुनर्वसन प्रकल्पात हक्काचे घर मिळेल या आशेवर चार वर्षे पत्राशेडमध्ये हलाखीचे दिवस काढले. चोहोबाजूंनी पत्रे लावलेल्या खोलीत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सर्व ऋतूंत एकेक दिवस ढकलत कधी एकदा हक्काचे घर मिळते, अशी अपेक्षा बाळगून त्यांनी गैरसोर्इंशी सामना केला.
एकदाचे घर मिळाले. परंतु स्थानिक कार्यकर्त्यांच्या डावपेचाचा परिणाम म्हणून त्यांना पहिल्याऐवजी सहाव्या मजल्यावरील सदनिका दिली गेली. वृद्ध, अंध, अपंग यांच्यासाठी खालच्या मजल्यावर सदनिका उपलब्ध करून देण्याचे धोरण असताना, साखरबार्इंना मात्र वृद्ध आणि पायाने अधू असूनही खालच्या मजल्यावरील घर दिले नाही. धडधाकट असलेल्यांनी वशिलेबाजीने खालच्या मजल्यावरील सदनिकांचा ताबा मिळविला. काहींनी त्या सदनिका भाड्याने दिल्या, तर काहींनी थेट विक्रीच केली. (प्रतिनिधी)

करारानुसार सुरुवातीची पाच वर्षे लिफ्टची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असली, तरी लिफ्ट दुरुस्तीसाठी कोणी येत नाही. झोपडपट्टीतून पुनर्वसन प्रकल्पात स्थलांतरित केलेल्या सदनिकाधारकांना लिफ्ट देखभाल-दुरुस्तीचा खर्च पेलवत नाही.

सहावा मजला : हतबलता संपणार कधी?
मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पात साई संतोष हौसिंग सोसायटीतील सहाव्या मजल्यावर ६०२ क्रमांकाची सदनिका साखरबाई शिंदे यांच्या नावे आहे. काठीचा आधार घेत तिथल्या तिथे पाय मोकळे करण्यासाठी थोडीशी हालचाल होते. एकेक दिवस खाटेवर पडून घालवण्याची वेळ आल्याने नैराश्य आले असल्याचे साखरबाई सांगतात. बाहेर जाता येत नाही. वर्षभरात कोणाच्या शुभकार्यात सहभागी होता आले नाही. मोकळ्या हवेत फेरफटका मारता आला नाही. पायाने अधू असल्याने खालच्या मजल्यावर सदनिका देऊ, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. एक अधिकारी बदलून गेले. दुसरे आले; परंतु आतापर्यंत गांभीर्याने विचार केला नाही. मुलगा दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. पाहण्यास जाण्याची इच्छा आहे, परंतु जाता येत नाही. ही हतबलता संपणार तरी कधी, असा सवाल त्यांनी उद्विग्नपणे उपस्थित केला.

सुरुवातीचे दोन-तीन महिने लिफ्ट सुरू असताना, जेवढ्या वेळा साखरबाई सहाव्या मजल्यावरून खाली आल्या. तेवढीच मोकळ्या हवेतील श्वास घेण्याची संधी त्यांना मिळाली. आता त्या सहाव्या मजल्यावर घराच्या बाहेर एका खाटेवर पडून आहेत. जिना चढणे-उतरणे त्यांना शक्य होत नाही. पॅसेजमध्ये बसून बसून त्यांचे वजनही वाढले आहे.

Web Title: Live in the pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.