भाडेकरुंनी देखील मोबाईल क्रमांक जोडावेत : महावितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 09:06 PM2019-06-19T21:06:08+5:302019-06-19T21:10:53+5:30
खंडित झालेला वीज पुरवठा, वीज पुर्ववत होण्याचा अंदाजे कालावधी, वीज बिलांसह विविध तपशील महावितरणच्या वतीने विद्युत ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो.
पुणे : खंडित झालेला वीज पुरवठा, वीज पुर्ववत होण्याचा अंदाजे कालावधी, वीज बिलांसह विविध तपशील महावितरणच्या वतीने विद्युत ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो. मात्र, शहरातील अनेक भाडेकरुंनी आपला मोबाईल क्रमांक न दिल्याने ते वापरत असलेल्या मीटरची माहिती त्यांना मिळत नाही, अथवा ती घरमालकाच्या मोबाईल क्रमांकावर जाते. त्यामुळे भाडेकरुंनी देखील आपला मोबाईल क्रमांक द्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
पुणे परिमंडलातील २७ लाख ४९ हजार वीजग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. त्यांनी वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. तसेच, मोबाईलवर पाठविलेला बिलाचा तपशील दाखवून विद्युत बिल देखील भरता येते. या शिवाय वीज ग्राहक राहत असलेल्या परिसरातील पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती, त्याचा कालावधी देखील ग्राहकांना कळविला जातो. या शिवाय नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याची माहिती आणि विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु होण्याच्या संभाव्य कालावधीची माहिती देखील ग्रहकांना दिली जाते. तसेच, दरमहा वीज बिलाची रक्कम, देय दिनांक याचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही मोबाईलवर पाठविली जाते.
मात्र, शहरातील अनेक भागामधे भाडेकरु राहत आहेत. त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंद झाल्याने, भाडेकरुंना त्याची माहिती मिळत नाही. प्रामुख्याने वाघोली, हिंजवडी, वाकड, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि खराडी परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे वीज वापरकर्त्यांनी अथवा भाडेकरुंनी आपण वापरत असलेल्या ग्राहक क्रमांकासोबत आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा.
---------------------
अशी करा मोबाईलची नोंद
पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तसेच मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे तालुक्यात २९ लाख २६ हजार वीजग्राहक आहेत. यापैकी ८३.९२ टक्के म्हणजे २७ लाख ४८ हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. ग्राहकांना महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ह्यएसएमएसह्णद्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. कॉल सेंटरच्या १९१२ अथवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.