...असा उघडा संसार, माय उपाशी झोपली! लॉकडाऊनमुळे ऊसतोडणी कामगारांवर उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:48 PM2020-04-15T18:48:22+5:302020-04-15T18:53:39+5:30
लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील टोळ्या अडकून पडल्या आहेत.
धनाजी कांबळे-
पुणे : उसतोडणीचा हंगाम संपला असला, तरी उसतोडणी कामगारांचे दु:ख काही संपलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या टोळ्या येतात आणि हंगाम संपताच आपल्या गावी निघून जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील टोळ्या अडकून पडल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील बोरजाईनगर गंजीखाना येथे ६०-६५ लहानमोठी बायाबापडी राहत आहेत. यात दोन महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. हे चित्र बहुतांश सर्वच कारखान्यांच्या भागांत पाहायला मिळत आहे. याबाबत साखर आयुक्त सौरभ राव यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.
काळा रापलेला देह. फाटकी पँट. अंगात बंडी. नाकाच्या खाली काळ्याभोर मिशा. कानात बाळी. पायात पायताण आणि हातात धारदार चकाकी कोयता घेतलेला मुकादम सांगेल तसं, म्हणेल त्या फडात थंडीवाऱ्यात, उन्हात राबणाऱ्या ऊसतोडणी कामगारांच्या वाट्याला सध्या उपासमारी आली आहे. लॉकलाउनमध्ये पोटालाच खायला काय नाही, तर शिकायचा सवालच उरत नाही, अशी अवस्था आहे. गावाच्या बाहेर वस्ती असल्याने परिसरातील लोक मदतीसाठी पुढे येतील, ही केवळ भाबडी आशा ठरत आहे. पलूसमध्ये उतरलेली ही टोळी. दीड महिन्यांपूर्वीच या पालावर एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
गेल्या चाळीस दिवसांपासून ते या भागात आहेत. मागच्या आठवड्यात नगरपरिषदेने काही धान्य दिलं होतं. पण, आता तेही संपलं आहे. सरकारी बाबूंना वाटतंय आमच्यातली काही लोकं खोटं बोलतात. त्यांना गावाकडं जायची घाई झालीय म्हणून पोटाला नाही, म्हणतात, असे बोलतात. पण पोटात आग पडल्यावर कोण काय बोलतय यापेक्षा भूक मोठी असते साहेब. ५ किलो बाजरी आणि ३ किलो तांदूळ मिळालं होतं. त्यात कसंतरी भागवणं सुरु आहे. दोन दिवसांपासनं आभाळ भरून येतयं, कुठं राहावं आणि काय करावं, डोकं काम करेना, असे पन्नाशीत पोचलेले बाळू वीर सांगत होते. मुरली शिदे, महादेव मल्हारी, श्रीहरी, दशरथ, जितेंद्र, रामहरी वीर, सिद्धार्थ सुरवसे, राजेंद्र खेमाडे, दीपक बनसोडे, प्रशांत भडगीळे, अभिमान केदार, शुभम कोरडे आदी तीन टोळयांचे लोक बोरजाईनगर, गंजिखाना या भागात २४ झोपड्यांमध्ये राहत आहेत. मूळचे बीड जिल्ह्यातील करचुंडी, धानोरा येथील असलेल्या या लोकांना गावी जाण्याची ओढ आहे, मात्र, लॉकडाउनमुळे ते केवळ अशक्य आहे.
कवी ज्ञानेश्वर कोळी यांच्या शब्दांत...
तोड उसाची संपली,
आम्ही निघालो गावाला,
कोस कोस दूर गाव,
माळ डोळ्यात साठला...
या ओळी प्रत्यक्षात आज महाराष्ट्राच्या अनेक भागांत कामगारांना जगाव्या लागत असल्याचे भयान वास्तव प्रशासनाने गांभीर्याने ध्यानात घेऊन यावर ठोस निर्णय घ्यावा, अशीच या कामगारांची विनवणी आहे.
................
पुणे विभागात ६६४ रिलिफ कॅम्प...
पुणे विभागात ६६४ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये ६० हजार ७९३ स्थलांतरीत मजूर आणि १ लाख १९ हजार २७३ मजुरांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. मात्र, काही उसतोडणी कामगारांपर्यंत अद्यापही मदत पोचलेली नसून, प्रशासनाने तत्काळ अशा बेघर कामगारांची व्यवस्था करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कॉ. धनाजी गुरव, पर्यावरण मित्र शरद झरे, बाळासाहेब मोटे यांनी केली आहे.
---
उसतोडणी कामगारांना मदतीची गरज असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मदत करणार आहोत.
- राजेंद्र पोळ, तहसीलदार