स्वतःच्या जीवाची परवा न करता केले यकृतदान; पोरीने बापाला मृत्यूच्या दारातून आणले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 01:28 PM2023-06-18T13:28:15+5:302023-06-18T13:29:35+5:30
अखेर १८ वर्षीय मुलीचा शस्त्रक्रियेचा निर्णय योग्य ठरला; वडील धोक्यातून बाहेर, मुलीची प्रकृतीही ठणठणीत
पुणे : मुलांच्या अंगात बापाचं रक्त असतं, पण एका बापाच्या अंगात त्याच्या पोटच्या मुलीचे यकृत असते, अशी घटना तुम्ही कधी ऐकली आहे का? पण ही घटना घडली आहे. यकृत नादुरुस्त झाल्याने (किडनी फेल) झाल्याने मृत्यूशी झुंजणाऱ्या वडिलांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी पोटच्या पोरीने वयाच्या १८व्या वर्षातच बापाला यकृत दान केले आणि बापाचा जीव वाचविला. ऋतुजा उर्फ ह्रिदिशा शेखर माने असे त्या मुलीचे नाव.
पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात राहणारी ऋतुजा ही मूळची सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या छोट्याशा गावातून आली आहे. तिचे वडील शेखर माने हे गावातील राजकीय व्यक्ती त्यामुळे त्यांचा संपर्क दांडगा होताच. २०१७ मध्ये वडिलांनी नगरपालिकेची निवडणूक लढविली. त्याचा निकालाचा दिवस होता. त्यामुळे घरी सगळेच निकालाची वाट पाहत होते. निकाल मनासारखा लागला. त्यामुळे सर्वचजण खुश होते. त्यावेळी ऋतुजा कराड येथे तर भाऊ उत्कर्ष पुण्यामध्ये शिक्षण घेत होता. वडील निवडून आल्यामुळे दोघे गावाकडे निघाले होते. त्याचवळी प्रवासात असताना ऋतुजाला मैत्रिणीचा फोन आला की तिच्या वडिलांंची प्रकृती खालावली आणि रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की त्यांचे यकृत (लिव्हर) खराब झाले. केस हाताबाहेर आहे. वेळ फारच कमी आहे. यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. निवडणूक नुकतीच झाल्याने घरात इतक्या मोठ्या पैशांची जुळवाजुळव करणे कठीणच होते तरी अनेकांकडून पै-पै करत पैशांची जुळवाजुळव सुरू झाली. आव्हान होते ते यकृत दाता भेटण्याची. सगळीकडे फोनाफोन झाली. अनेक राजकीय अधिकाऱ्यांकडून मोठ्या रुग्णालयात फोन खणखणले, मात्र परिणाम शून्य. अखेर ऋतुजाने निर्णय घेतला की आपण स्वत:च वडिलांना यकृतदान करायचे. त्यासाठी घरच्यांनी विरोध केला. यकृत दान केल्यावर तिच्या भविष्याचे काय? तिचे लग्न जुळविताना कोण मुलगा तिला स्वीकारणार किंवा त्यापुढे जाऊन तिच्या बाळंतपणात काय धोका येऊ शकतो अशा साऱ्या शक्यतांनी घरच्यांसह डॉक्टर व नर्स यांनीही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांना जीवदान मिळण्यासाठी ऋतुजाने निर्णय पक्का केला. भविष्यातील लग्न, मूल यापेक्षा वडिलांचे जगणे सर्वात महत्त्वाचे त्यासाठी ती यकृतदानाच्या निर्णयावर ठाम राहिली.
अखेर शस्त्रक्रिया अन् ऋतुजाच्या निर्णय योग्य ठरला. वडील धोक्यातून बाहेर पडले आणि ऋतुजाची प्रकृतीही ठणठणीत राहिली. पुढे काही दिवसातच बाप-बेटी दोघेही अगदी ठणठणीत झाले.
लष्करातील कॅप्टन होणार ऋतुजाच्या जोडीदार
आज ती आणि तिचे कुटुंबीय खुश आहेत ते तिने केलेल्या धाडसामुळे. घरच्यांना तिच्या भविष्याची चिंता तर होतीच; पण समाजाला खूप प्रश्न पडले की मुलगी आहे लग्न होईल की नाही? मुलांना जन्म देऊ शकेल की नाही. मग कोण लग्न करेल हिच्याशी? पण डॉक्टरांनी शास्त्रीय कारणे सांगून तिला कोणताच धोका नसल्याचे समजावून सांगितले आणि झाले ही तसेच भारतीय सैन्य दलालीत कॅप्टनकडून या धाडसी मुलीला लग्नाची मागणी आली. तिच्या ऋतुजासह कुटुंबीयांनीही त्याला होकार दिला आणि २७ जून रोजी हे दोन्ही धाडसी वीर एकमेकांशी रेशीमगाठीत बांधले जाणार आहेत.