पुण्यात महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:11 PM2018-10-23T14:11:55+5:302018-10-23T14:22:28+5:30
अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने मेंदु मृत झालेल्या ५२ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे.
पुणे : अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने मेंदु मृत झालेल्या ५२ वर्षीय महिलेच्या अवयदानामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे. या महिलेचे मुत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ससूनमध्ये यशस्वीपणे करण्यात आली. ससूनमध्ये मुत्रपिंडाची ही दहावी व यकृत प्रत्यारोपणाची दुसरी शस्त्रक्रिया ठरली आहे.
खटाव तालुक्यातील वरूड गावातील ५२ वर्षीय महिला पतीसह दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली. साताऱ्यात उपचार घेतल्यानंतर महिलेला नातेवाईकांनी ससूनमध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान महिलेचा मेंदु मृत झाला. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयव दानास संमती दर्शविली. महिलेचे मुत्रपिंड इंदापूर येथील ३८ वर्षीय रिक्षा चालकाला देण्यात आले. ते २०१२ पासून किडनी विकाराने ग्रस्त होते. २०१४ पासून त्यास आठवड्यातून दोन वेळा डायलिसिसवर उपचार घ्यावे लागत होते. कुटुंबामध्ये पत्नी गृहिणी, बारा वर्षाची एक मुलगी व नऊ वर्षाचा मुलगा आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ससूनमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेच्या पथकात डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. भालचंद्र काश्यपी, डॉ. अभिजित पाटील आणि डॉ. शंकर मुंढे यांचा समावेश होता.
सातारा जिल्ह्यातील जकातवाडी गावातील ५४ वर्षीय निवृत्त सैनिकावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ते तीन वर्षांपासून ‘लिव्हर सिरॉसिस’ या आजाराने त्रस्त होते. खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरु होते. ससूनच्या वैद्यकीय सामाजिक अधिक्षक विभागामार्फत ससूनमध्ये यकृत प्रत्यारोपण होत असल्याची त्यांना माहिती मिळाली. म्हणून त्यांनी काही दिवसांपुर्वी ससूनमध्ये यकृत प्रत्यारोपणासाठी नाव नोंदविले होते. या शस्त्रक्रियेच्या पथकात डॉ. मनीष वर्मा, डॉ.मंजुनाथ, डॉ. कमलेश बोकील, डॉ. शीतल धडफळे, डॉ.किरण जाधव, डॉ.संतोष थोरात, भूल तज्ञ डॉ.विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी यांचा समावेश होता. डॉ. हरीश टाटिया व अर्जुन राठोड यांनी सहकार्य केले.
-----------