मेट्रोमुळे वाचले तब्बल हजार वृक्षांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 02:20 PM2019-06-05T14:20:27+5:302019-06-05T14:23:31+5:30
नवे कोणतेही बांधकाम करताना त्यात पहिला बळी जात असेल तर तो त्या जागांवरील वृक्षांचा....
- राजू इनामदार-
पुणे : नवे कोणतेही बांधकाम करताना त्यात पहिला बळी जात असेल तर तो त्या जागांवरील वृक्षांचा. महामेट्रो कंपनीने मात्र मेट्रो मार्गाचे काम सुरू करतानाच एकाही झाडाचा बळी पडू देणार नाही, असा निर्धारच केला होता व तो पाळलाही. तब्बल १ हजार ८० वृक्षांचे त्यांनी पुनर्रोपण केले. त्यातील ८० टक्के झाडे जगवलीच शिवाय नव्या वेगवेगळ्या जागांवर १२ हजार ७०० झाडे लावून शहराच्या वृक्षराजीत भरही टाकली.
मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली त्याचवेळी पर्यावरण तज्ज्ञांनी त्यांच्या कामावर आक्षेप घेतले. त्यातही नदीपात्रातील कामावरून तर थेट राष्ट्रीय हरीत लवादात दादही मागितली. त्याआधीच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या कामात एकही झाड पाडले जाणार नाही, असे निर्धारपूर्वक जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा ३१ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे काम सुरू होताच उद्यानविद्या व्यवस्थापक हे स्वतंत्र पद तयार करून त्यांना आवश्यक ती यंत्रसामग्री तसेच तंत्रज्ञान व निधीही उपलब्ध करून दिला.
त्यामुळेच मेट्रो मार्गात जिथे-जिथे मोठे वृक्ष येत होते त्या सर्व वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. कोथरूड टेकडी व कृषी महाविद्यालय या ठिकाणी डेपो असल्यामुळे तिथे सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ४५२ व ५०५ झाडांवर कुऱ्हाड पडणार होती. ही सर्व झाडे पुनर्रोपणाच्या तंत्रज्ञानाने वाचवण्यात आली. त्यांना खोल खड्डा करून मुळापासून काढण्यात आले. त्याच परिसरात जिथे कोणाला त्रास होणार नाही, तिथे खड्डे खणून त्या खड्ड्यांत ही झाडे लावण्यात आली.
.......
मेट्रोने जपली जैवविविधताही
नदीपात्रातील मेट्रोच्या कामाविरोधात हरित लवादात दावा दाखल झाला, त्यावेळी हरित लवादाने व नंतर सर्वोच्च न्यायालयानेही मेट्रोच्या बाजूने निकाल दिला. मात्र, नदीपात्रातील सर्व काम पर्यावरण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करण्याचे बंधनही घातले. त्यांनी नदीपात्रात खड्डे खोदताना त्या खड्ड्याच्या वरचा एक ते दीड फुटापर्यंतचा जमिनीचा तुकडा जपून ठेवण्याचा व काम झाल्यानंतर पुन्हा तो तिथेच लावण्याच्या सूचना दिल्या. या तुकड्यात पात्रातील जैविविविधतेचे नमुने असतात, ते वाचावेत, यासाठी असे सांगण्यात आले. त्याप्रमाणेच महामेट्रोने ठेकेदाराला कल्पना देत प्रत्येक खड्ड्याचा असा तुकडा कापून ठेवला व काम होताच पुन्हा तो खांबाभोवती जमिनीत पुरण्यात आला.
........
आणखी झाडे पुनर्रोपित करणार
वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे महामेट्रोचे काम सुरूच राहणार आहे. त्यासाठीचे आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान कितीही खर्च झाला तरी वापरण्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचे आदेश आहेत. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ते वृक्षारोपणासंबधीचा सर्व अहवाल घेत असतात. वृक्षासंबधीचे कोणतेही काम करायचे असल्यास त्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी लागते. ती घेतल्यानंतरच काम करण्यात येते. - बाळासाहेब जगताप, उद्यानविद्या व्यवस्थापक, महामेट्रो, पुणे
............