विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्यांना जीवदान; पुण्यातील पिंपळवंडी शिवारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 06:56 PM2018-01-18T18:56:53+5:302018-01-18T18:59:59+5:30
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी शिवारातील बंगलावस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या ४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश आले आहे.
आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी शिवारातील बंगलावस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या ४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश आले आहे.
पिंपळवंडीच्या बंगलावस्ती येथील सुरेश सखाराम पोटे यांचे विहिरीत गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास बिबट्याचे दोन बछडे पडून कठड्यावर बसले असल्याचे विजय कालेकर, शुभम कालेकर, वैभव कालेकर, शशिकांत घाडगे, यांनी पाहिले. तत्काळ विजय कालेकर यांनी त्यांना वाचविण्यासाठी ओतूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांचेशी संपर्क साधला. वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे डॉ. अजय देशमुख हे बिबट रेस्क्यू पथकासह घटनास्थळी आले.
दरम्यान वनकर्मचारी व ग्रामस्थ यांनी त्यांना विहिरीतून वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डॉ अजय देशमुख हे दोरीच्या साह्याने खाली उतरले व अखेर दीड तासाच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. हे बछडे अंदाजे ४ ते ५ महिने वयाचे असल्याचे वनपाल संदीप खट्टे, वनरक्षक विवेक विभुते यांनी सांगितले.
त्यांच्यावर ओतुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर माणिकडोह येथील निवारण केंद्रात नेण्यात आले आहे. तर मादी बिबट्यामागे फिरत असताना हे बछडे विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बंगलावस्ती या परिसरात बिबट्याची मादी असण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथे तातडीने वनविभाग पिंजरा लावला आहे. या घटनेने पिंपळवंडी परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते.