पिकांना जीवदान!
By admin | Published: May 11, 2015 06:02 AM2015-05-11T06:02:58+5:302015-05-11T06:02:58+5:30
पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत पाणी सोडण्यात आल्याने याचा फायदा गावांना होत आहे.
मढ : पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे पिंपळगाव जोगा, दत्तवाडी, डिंगोरे, मांदारणे, उदापूर, नेतवड, माळवाडी या परिसरातील पाळीव दुभत्या प्राण्यांबरोबरच, भटक्या व जंगली प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
तसेच पुष्पावती नदीत पाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली उन्हाळी पिके व भाजीपाला वर्गीय नगदी पिकांना जीवदान मिळाले असून, ऐन मे महिन्यात पाण्याचे आवर्तन नदीत सोडल्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक व मेंढपाळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सध्या या परिसरात टोमॅटो, गाजर, मिरची, कोबी, फ्लॉवर, बीट, भेंडी, गवार ही नगदी पिके, तर केळी, ऊस ही ठोक पिके तसेच फुलवर्गीयमध्ये झेंडूही मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. या सर्व पिकांना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या आवर्तनाने जीवदान मिळणार आहे. तसेच ऐन उन्हाळ्यात परिसरातील विहिरींची पाणीपातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)