राज्यातील पशुधनाचे काम निम्म्याच मनुष्यबळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:50+5:302021-06-05T04:08:50+5:30
वर्ग ३ आणि ४ संवर्ग : मंजूर ३७९८ पैकी तब्बल २०४४ पदे रिक्त पुणे : राज्यातील पशुसंवर्धन विभागात अपुरे ...
वर्ग ३ आणि ४ संवर्ग : मंजूर ३७९८ पैकी तब्बल २०४४ पदे रिक्त
पुणे : राज्यातील पशुसंवर्धन विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. वर्ग ३ आणि ४ संवर्गातील मंजूर ३७९८ पैकी तब्बल २०४४ पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धनाचे काम अर्ध्यापेक्षाही कमी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. साथरोग होऊ नये म्हणून दरवर्षी पशुधनाचे लसीकरण करण्यात येते. मात्र, यंदा अनेक जिल्ह्यांत पशुधनांचे लसीकरण रखडल्याचे चित्र आहे.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक जिल्ह्यांत आजारी पशुधनावर वेळेत औषधोपचार करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत औषधोपचाराअभावी पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही राज्य शासन रिक्त पदे भरत नाही. काही जिल्ह्यांतून याबाबत शासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, तरीही काही हालचाली होत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पशुधनांना फऱ्या, घटसर्प तसेच अन्य साथीचे आजार होऊ नये यासाठी आधीच लसीकरण करण्यात येते. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे वेळेत लसीकरण करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे चित्र आहे.
-----
वर्ग ३ मधील मनुष्यबळ
* मंजूर पदे :- १८९४
* भरलेली पदे :- ९१३
* रिक्त पदे :- ९८३
----
वर्ग ४ मधील मनुष्यबळ
* मंजूर पदे :- १९०४
* भरलेली पदे :- ८४३
* रिक्त पदे :- १०६१
* एकूण मंजूर पदे ३७९८, भरलेली एकूण पदे १७५६ तर रिक्त असलेली २०४४ पदे रिक्त आहेत.