''स्वमग्नता'' आजारावर यशस्वीपणे मात करणाऱ्या मुलाची प्रेरणादायी कहाणी 'लिविंग विथ ऑटिझम'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 04:48 PM2019-12-12T16:48:43+5:302019-12-12T17:12:03+5:30
स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो..
पुणे : म्हणतात ना जन्म आणि मृत्यू हा मानवाच्या हाती नाही.. त्यात काहीजण जन्म: ताच अपंगत्व घेऊन येतात.पण जसे जसे मूल मोठे मोठे होत जाते तसे त्याच्यामधील अपंगत्वाचे लक्षणे अधिकाधिक ठळकपणे दिसू लागतात. आणि मग कुटुंबाची त्रेधारपीठ उडते.. कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकते आणि पुढचा संपूर्ण मार्गच अंधारमय होऊन जातो.. त्यातून नवखा काही आजार असेल तर विचारताच सोय नाही..अशाच एका अप्रचलित आजारावर सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने ''लिविंग विथ ऑटिझम'' या माहितीपटाची निर्मिती केली आहे. स्वमग्नता याविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी आणि अशा परिस्थितीत मुलांच्या पालकांनी खचून न जाता नेमकी काय भूमिका घ्यावी, मुलाला योग्य उपचार देऊन या आजारातून मार्ग कसा काढता येईल यावर हा माहितीपट भाष्य करतो.
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गौरविण्यात आलेल्या '' लिविंग विथ ऑटिझम '' या माहितीपटात 'स्वमग्नता' या आजारांवर योग्य ते उपचार घेऊन यशस्वी मात करत जागतिक विक्रमाची नोंद केलेल्या पिंपरी चिंचवडच्या पृथ्वीराज इंगळे या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास मांडण्यात आला आहे..पृथ्वीराजने सलग तास गायनाच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या माहितीपटाची निर्मिती विवेक नाबर आणि दिग्दर्शन वासिम पठाण यांनी केले आहे.
स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो.त्याचे पूर्ण नाव 'सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर' असे आहे. इंग्रजीत त्याला 'ऑटिझम' म्हणतात. यामध्ये बहुतांश बालके शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्थिर असलेली पाहावयास मिळतात. मात्र काही मुलांमध्ये शारीरिक अपंगत्व तसेच बौद्धिकदृष्ट्या इतर मुलांच्या तुलनेत अतिशय हळुवार संवेदना पाहायला मिळतात. म्हणजेच ही मुले नॉर्मल नसतात. अशा मुलांच्या बाबतीत, सध्याच्या काळात ' ऑटिझम' किंवा 'स्वमग्नता' हा शब्दप्रयोग अनेकांना ऐकायला मिळतो आहे. मात्र त्या संदर्भातील माहितीचा अभाव सगळीकडेच जाणवतो. मूल 2 ते 3 वर्षांचं होईपर्यंत त्याच्या पालकांनाही स्वमग्नतेबाबत कल्पना नसते. कधी कधी तर 8-10 वर्षांपर्यंतही लक्षात येत नाही. अशा व्यक्ती आपल्याच विश्वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही.
या माहितीपटाचे दिग्दर्शक वासिम पठाण म्हणाले, स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक लक्षण म्हणजे पूर्ण विकार असे म्हणता येणार नाही, म्हणून ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे असे म्हणतात. स्वमग्न व्यक्ती स्वत:मध्येच रमलेल्या दिसतात. संवादासाठी शब्द उच्चारण्याएवजी बोट दाखवितात. खाणाखुणांचा वापर करतात. मान हलवूनच होकार किंवा नकार देतात. कोणत्याच प्रकारच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिसाद विलंबाने मिळतो तोही संकेतानेच.. अशी लक्षणे आढळल्यास मनोविकारतज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.या माहितीपटाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मानसिक अवस्थेला कोण-कोणत्या पद्धतीने सामोरे जायला हवे या बाबींवर प्रकाश टाकलेला दिसून येतोय. यामध्ये पृथ्वीराज इंगळे या स्वमग्न मुलाची जडण-घडण आणि त्याची विश्वविक्रमापर्यंतची वाटचाल अतिशय प्रभावी पद्धतीने मांडली दिसते.
मुळात डॉक्टरांच्या मते ही अवस्था जन्मभर त्या मुलांच्या सोबतच राहते. तर मग हा आजार बरा होतो का? आपले मुल स्वमग्न असेल तर आपल्या हातात काय उरते? आपण हताश होऊन बसायचे का? या सारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहितीपट पाहिल्यावर मिळतात.
अर्थात ह्यात पालकांचीदेखील जबाबदारी फार मोठी असते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाचा आत्मविश्वास कमी होणार नाही असे वातावरण घरात तयार करणे, त्याच्या वैगुण्यावर सतत त्याच्या समोर चर्चा न करणे, त्याच्या अंगभूत गुणांचा सुयोग्य वापर कसा करून घेता येईल ह्याचा विचार करून त्याला सतत स्वतंत्रपणे काम करण्यास प्रोत्साहित करणे हेच त्या पालकांचे आद्य कर्तव्य असावे, हे माहितीपटाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. समाजाने देखील अशा मुलांप्रती केवळ कोरडी सहानुभूती न बाळगता त्यांची मानसिकता ओळखून त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तणूक ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.